आयात 50.6 अब्ज डॉलरसह 17 महिन्यांच्या निचांकावर : रशियातून सर्वाधिक आयात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील आयात घटली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चीन, सौदी अरेबिया, इराक, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. जानेवारीमध्ये भारताची आयात 50.6 अब्ज डॉलर राहिली असून 17 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याचीही यावेळी नेंद केली आहे. भारताच्या मुख्य 10 आयात भागीदारांपैकी केवळ युएइ (12.1 टक्के), अमेरिका (27.4 टक्के), रशिया (297.4 टक्के) आणि इंडोनेशिया (22.9 टक्के) यांची आयात वाढवली आहे. भारताच्या एकूण आयातीमध्ये टॉप 10 देशांचा वाटा 60 टक्क्यांहून अधिकचा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. रशियामधून आयात सर्वात वेगाने वाढली आणि जानेवारीमध्ये ती 4 पटीने वाढून 4.48 अब्ज डॉलरवर गेली आहे.
एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेतरशियाने आता अमेरिका आणि यूएईला मागे टाकले आहे. ही तीव्र वाढ प्रामुख्याने स्वस्त तेल आयातीमुळे झाली आहे, जी भारत रशियाकडून खरेदी करत आहे. मूल्याच्या बाबतीत, रशिया हा जानेवारीमध्ये भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात भागीदार आहे, त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो.गेल्या अनेक वर्षांपासून चीन हा भारताचा सर्वात मोठा आयात भागीदार राहिला आहे.
जानेवारीमध्ये चीनकडून आयात 13 टक्क्यांनी कमी राहिली आहे. सरकार अजूनही चीन आणि इतर देशांमधील उत्पादनांसाठी आयातीचे आकडे तयार करत आहे, परंतु कोविडमुळे कमी आयातीसह देशांतर्गत मागणी कमी राहिली आहे. सौदी अरेबिया आणि इराक हे कच्च्या तेलाचे मुख्य पुरवठादार आहेत, आयात अनुक्रमे 14.3 टक्के आणि 11.2 टक्क्यांनी घसरली आहे. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधून आयात अनुक्रमे 14.1 टक्के, 26.7 टक्के आणि 9.8 टक्क्यांनी कमी झाली आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने असेही सांगितले की, आयातीतील घट हे मेक इन इंडिया कार्यक्रम यशस्वी होत असल्याचेही सूचित करते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे वस्तुंच्या किमती वाढल्या आणि आयात खर्च वाढला. 30 प्रमुख आयात क्षेत्रांपैकी किमान 17 क्षेत्रांमध्ये आयात घटली आहे.
आयातीलमधील प्रमुख घटक
यामध्ये अजैविक रसायने, प्लास्टिक, मोती, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतरांचा समावेश आहे. निर्यातीत पाहता अमेरिका, चीन, सिंगापूर, बांगलादेश, ब्राझील आणि जर्मनीसह भारताच्या शीर्ष 10 निर्यात भागीदारांपैकी 6 मध्ये घट झाली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत या 10 देशांचा वाटा 47.7 टक्के आहे. भारतातून व्यावसायिक वस्तूंची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारीमध्ये 6.5 टक्क्यांनी घसरून 32.91 अब्ज डॉलरवर आली आहे.









