अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य : अन्यथा प्रत्युत्तरादाखल आयातशुल्क लादू
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
भारत अमेरिकेच्या उत्पादनांवरील आयातशुल्क कमी करेल अशी मला अपेक्षा आहे. परंतु भारताने हे आयातशुल्क कमी केले नाही तर 2 एप्रिलपासून माझे प्रशासन प्रत्युत्तरादाखल आयातशुल्क आकारणार असल्याचा इशारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉरमुळे विरोधी देशांना सामोरे जाण्यास मदत मिळणार असल्याचे वक्तव्य केले आहे. भारत हा सर्वाधिक आयातशुलक आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि हीच भारताबद्दल मला समस्या आहे. भारत आयातशुल्क कमी करेल असे माझे मानणे आहे, अन्यथा भारताइतकेच आयातशुल्क आम्ही 2 एप्रिलपासून लागू करणार आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
2 एप्रिलपासून सर्व देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी यापूर्वीच केली आहे. भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉरकरता अनेक देश एकत्र आले आहेत. यातून आमच्या व्यापाराला नुकसान पोहोचविणाऱ्या देशांचा सामना केला जाणार आहे. या कॉरिडॉरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. भारत आयातशुल्क कमी करण्यास तयार झाला असल्याचा दावा ट्रम्प यांनी चालू महिन्याच्या प्रारंभी केला होता. परंतु भारताचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी 10 मार्च रोजी संसदीय समितीसमोर भारत आणि अमेरिका यांच्यात अद्याप शुल्कावरून चर्चा सुरू आहे आणि अद्याप यासंबंधी कुठलाच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.









