2031 पर्यंत हा टप्पा प्राप्त करणार असल्याचा एस अॅण्ड पीच्या अहवालात अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.4 ट्रिलियन डॉलरवरुन आर्थिक वर्ष 2031 मध्ये 6.7 ट्रिलियन डॉलरची होणार असल्याचा अंदाज एस अॅण्ड पी ग्लोबल यांनी मांडलेल्या आर्थिक अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे. भारताचा विकास दर (जीडीपी) 6.7 टक्के इतका राहणार असून तसेच दरडोई जीडीपीदेखील 4,500 डॉलरपर्यंत वधारणार असल्याचे सांगितले आहे.
मागील आठवड्यात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने एका अहवालात असेही म्हटले आहे, की भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023 मधील 3.5 ट्रिलियन वरुन 2030 च्या अखेरीस 6 ट्रिलियनची होणार आहे. विदेशी व्यापार आणि देशांतर्गत व्यापार वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याचदरम्यान दरडोई उत्पन्न 2,450 डॉलरवरुन 4,000 डॉलरपर्यंत सुमारे 70 टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकीत केले आहे.
एस अॅड पी अहवालात म्हटले आहे की जागतिक मंदीची एकंदर स्थिती आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दरात केलेली वाढ यामुळे विकास दर केवळ 6 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकतो. तरीसुद्धा, जी-20 देशांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. अहवालानुसार, भारतातील खासगी कंपन्यांचा ताळेबंद मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदेखील हळूहळू वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्राचे मुख्य
केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी या अहवालानंतर एका विशेष संवादात उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, 2030 पर्यंत सात ते 7.5 टक्के वाढ साधायची असेल, तर उच्च मूल्यवर्धित सेवांकडे वळावे लागेल. ते म्हणाले की, कुशल मनुष्यबळ, उत्तम पायाभूत सुविधा, उत्कृष्ट औद्योगिक वातावरण आणि प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ या बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे.









