11 महिन्यांमध्ये वाहन आणि एफएमसीजीसह 4 क्षेत्रांमध्ये 22 हजार कोटींची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील प्रमुख देशांपैकी चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ असलेल्या भारताने सतत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. यामध्ये फास्ट फूडपासून ते वाहनांपर्यंत व मोबाईल फोनपर्यंत भारतीय ग्राहकांचा खर्च सातत्याने वाढत आहे. वर्ष 2022 च्या डिसेंबर तिमाहीत ग्राहकांचा खर्च 24.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती आहे.
मागील सप्टेंबर तिमाहीत 23.09 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 7.28 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 11 महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, ग्राहक सेवा आणि एफएमसीजी या चार प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये तब्बल 22 हजार कोटी रुपयांहून अधिकची विदेशी गुंतवणूक (एफडीआय) करण्यात आली असल्याची माहिती एनएसडीएल डाटावरुन उपलब्ध झाली आहे.
मागील आर्थिक वर्षातील विक्रमी एफडीआयचा प्रवाह
वर्ष आलेली एफडीआय
2018-19 5.10 लाख कोटी रुपये
2019-20 6.12 लाख कोटी रुपये
2020-21 6.74 लाख कोटी रुपये
2021-22 6.88 लाख कोटी रुपये
2022-23 2.91 लाख कोटी रुपये (एप्रिल ते डिसेंबर)
विदेशी गुंतवणूक भारताकडे येण्याची मुख्य कारणे
वेगाने वाढणारा मध्यममार्ग
भारतात मध्यमवर्ग झपाट्याने वाढत आहे. पुढील आठ वर्षांत म्हणजे 2030 पर्यंत वार्षिक 8.5 टक्के दराने 80 कोटींहून अधिकवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
2.दरडोई उत्पन्नात वाढ
एनएसओच्या मते, 2014-15 मध्ये देशाचे दरडोई उत्पन्न वार्षिक 86,647 रुपये होते. जे 2021-22 पर्यंत दुप्पट होऊन 1.72 लाख रुपये झाले आहे.
3.कौटुंबिक खर्चात वाढ
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार, मागील दशकात कौटुंबिक खर्चात वार्षिक 10 टक्के वाढ झाली आहे. उच्च वर्गाचा खर्च 20 टक्के दराने वाढत आहे.
4.टीव्ही, फ्रीजची विक्री वाढली
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, टीव्ही, रेफ्रिजरेटर इत्यादीसारख्या वस्तूंची विक्री चालू आर्थिक वर्षात सुमारे 18 टक्के वाढीसह 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत आहेत.









