अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांकडून प्रशंसा : परिषद जागतिक आव्हाने स्वीकारण्यास समर्थ
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
भारताने जी-20 संघटनेचे नेतृत्व उत्तमप्रकारे केले आहे. भारताच्या नेतृत्वात ही संघटना जागतिक आव्हाने स्वीकारण्यासाठी अधिकच बळकट झाली आहे. रशियाने यंदा या परिषदेत कृतीशील सहभाग घेतला नसला तरी, परिषदेने भारताच्या नेतृत्वात प्रभावी कामगिरी केली, अशी प्रशंसा अमेरिकेचे अर्थमंत्री (ट्रेझरी सेक्रेटरी) जेनेट यालन यांनी शुक्रवारी केली आहे.
जी-20 संघटनेचा विस्तार, सदस्य देशांच्या आर्थिक अडचणी, सदस्य देशांवरील कर्जांच्या भाराचा प्रश्न, बहुराष्ट्रीय बँकांच्या समस्या, कमजोर देशांच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न इत्यादी मुद्द्यांसंबंधी या संघटनेची आणि तिच्या नेतृत्वाची कामगिरी स्पृहणीय होती, असेही प्रतिपादन यालन यांनी केले.
संयुक्त निवेदनाचे आव्हान
शिखर परिषदेच्या अंती सर्व सदस्य देशांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जाणार आहे. पण ते कसे तयार करायचे हे आव्हान संघटनेसमोर आहे. कारण या निवेदनात अपरिहार्यपणे युक्रेन युद्धाचा उल्लेख येणार आहे. तो कोणत्या भाषेत आणि कोणत्या प्रकारे करायचा हा प्रश्न आहे. कोणताही सदस्यदेश दुखावला जाऊ नये, परंतु निवेदनातील संदेश स्पष्ट असला पाहिजे, अशा प्रकारे त्यातील आशयाची रचना करावी लागणार असून त्यात भारताच्या भूमिकेचाही आगत्याने विचार केला जाईल, असेही आश्वासन यालन यांनी दिले.









