पंतप्रधान मोदी-नेतान्याहू यांच्यात चर्चा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘भारताने नेहमीच कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केलेला आहे. इस्रायलवर अमानुष दहशतवादी हल्ला झाला असून प्रत्येक भारतीय नागरिक या प्रसंगी इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. भारताचे इस्रायलला पूर्ण समर्थन आहे.’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना भारताचा पाठिंबा व्यक्त केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारी दूरध्वनीवरुन इस्रायलमधील परिस्थितीवर चर्चा झाली. नेतान्याहू यांनी स्वत: दूरध्वनी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या चार दिवसांमधील घटनांची माहिती दिली.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी मला दूरध्वनी करुन सर्व घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली. मी यासाठी त्यांचा आभारी आहे. इस्रायलला दहशतवादाच्या विरोधात भारताचे पूर्ण समर्थन आहे. सर्व भारतीय आपल्या पाठीशी आहेत. दहशतवाद, मग तो कोणत्याही कारणासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा असो, तो निंदनीय आहे. भारताची ही प्रथमपासून भूमिका आहे. इस्रायल लवकरच या स्थितीवर नियंत्रण प्राप्त करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्यांदा प्रतिक्रिया
इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध करणारी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा व्यक्त केली आहे. इस्रायलवर हमासचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्वरित त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आता नेतान्याहू यांच्याशी बोलताना त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.
भारताच्या संतप्त प्रतिक्रिया
हमासने इस्रायलमध्ये केलेले क्रूर अत्याचार आणि अत्यंत घृणास्पद तसेच विकृत कृत्ये यांचे व्हिडीओ प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे भारतीय लोकांमध्येही संतप्त भावना आहे. या संतापाला लोक इंटरनेटवरुन वाट मोकळी करुन देत असल्याचे दिसत आहे. हमासचे समर्थन करणारे लोकही ज्या प्रकारे ट्रोल केले जात आहेत, त्यावरुन भारतीय लोकांमध्ये किती संताप आहे, हे स्पष्ट होत आहे. हमासने केलेल्या या अनावश्यक, निर्घृण आणि आततायी कृत्यांमुळे या इस्लामी दहशतवादी संघटनेने स्वत:चीच अत्यंत मोठी हानी करुन घेतली, अशी प्रतिक्रिया येत आहे.
राजदूतांकडून आभार
या घटनाक्रमात भारताने सातत्याने इस्रायलची पाठराखण केली आहे. यासाठी आमचा देश भारताचा आभारी आहे, असे वक्तव्य भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी केले आहे. भारताने आम्हाला खरोखरच महत्त्वाचे समर्थन दिले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांचे मी व्यक्तीश: आभार मानू शकत नाही, याचे मला मनस्वी दु:ख होते, असे गिलन यांनी त्यांच्या संदेशात प्रतिपादन केले आहे.









