वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्टेज-2 विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी दर्जेदार कामगिरी करत विविध 4 सांघिक तिरंदाजी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रिकर्व्ह आणि कंपाऊंड सांघिक तिरंदाजीत भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या टॉप सिडेड मृणाल चौहान, तुषार शेळके आणि जयंता तालुकदार यांनी उपांत्य फेरीच्या लढतीत यजमान उझ्बेकच्या चेन युए, कॅरोरोव्ह आणि सॅडिकोव्ह यांचा 6-0 (56-54, 57-54, 56-53) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तत्पूर्वी या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने सलामीच्या लढतीत किर्जीस्तानचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला होता.
या स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भारतीय महिला रिकर्व्ह संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आता चीन आणि भारत यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. भारतीय महिलाने रिकर्व्ह संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सौदी अरेबियाचा 6-0 असा पराभव केला होता. त्यानंतर उपांत्य लढतीत भारतीय महिला रिकर्व्ह संघाला प्रतिस्पर्धी संघाकडून पुढे चाल मिळाली.
पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड विभागात भारताच्या टॉप सिडेड संघाने सौदी अरेबियाचा 236-221 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अभिषेक वर्मा कुशल दलाल आणि अमित हे भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या क्रीडा प्रकारात भारत आणि हाँगकाँग यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या परिणीत कौर, प्रगती आणि रेगिनी मार्को यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हाँगकाँग आणि भारत यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. ताश्कंदमधील या स्पर्धेसाठी भारताने आपले दुय्यम दर्जाचे संघ पाठवले आहेत.









