वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कझाकस्तानमधील नुर सुल्तान येथे सुरू असलेल्या इलोर्डा चषक महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या चार स्पर्धकांनी विविध वजनगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून त्यामध्ये विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जमुना बोरोचा समावेश आहे.
महिलांच्या 54 किलो वजनगटात आसामच्या जमुनाने उपांत्य फेरीची लढत एकतर्फी जिंकली. त्याचप्रमाणे भारताच्या के. श्रीनिवासनने 48 किलो गटात, गितिकाने 48 किलो गटात तसेच अलफियाने 81 किलोवरील वजनगटात अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारताच्या साक्षी आणि सोनिया यांचे आव्हान संपुष्टात आले.
पुरूषांच्या विभागात कुलदीप (48 किलो) आणि जुगनू (92 किलो) यांचे आव्हान कझाकस्तानच्या मुष्टीयोद्धय़ांनी संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे भारताच्या अनंतला चीनच्या फेंगकडून हार पत्करावी लागली. 57 किलो वजनगटात कझाकस्तानच्या सेरिकने भारताच्या सचिनचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारत, उझ्बेक, यजमान कझाकस्तान, क्यूबा, चीन आणि मंगोलिया सहभागी झाले असून सुवर्णपदक विजेत्याला 700, रौप्यपदक विजेत्याला 400 आणि कास्यपदक विजेत्याला 200 डॉलर्सचे बक्षीस दिले जात आहे.









