पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या इंडिया पक्षाची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरला देशाची आथिर्क राजधानी मुंबईत होत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत असून नव्या लोगोचे लाँचिंग तसेच आघाडीच्या 11 सदस्यांच्या कमिटीत कोणाकोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशातील विरोधी पक्षानी मिळून आघाडी तयार केली आहे. या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए ( नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स ) विरूद्ध इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स)अशी लढत पाहायला मिळणार आहे. इंडिया पक्षाची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या लोगोची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेतफत्वाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी दलाचे 5 मुख्यमंत्री, 26 राजकीय पक्ष आणि 80 नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत 11 सदस्यांची कमिटी बनवण्यात येणार आहे. या कमिटीत शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तफणमुल काँग्रेस, डावे आणि डिएमकेसहित प्रमुख दलातील एका-एका सदस्याची निवड करण्यात येणार आहे. आता इंडिया आघाडीचा लोगो कसा असणार आणि आघाडीच्या 11 सदस्यांच्या कमिटीत कोणकोणते नेते असणार आहेत, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जुडेगा भारत, जितेगा इंडिया या स्लोगनचे बॅनर मुंबईत लागले असून पाटणा आणि बेंगळुरू येथे झालेल्या बैठकानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंडियाची बैठक होत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्रात 2019 ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता, या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता हे दोन नेते इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. इंडिया आघाडीला मिळणारा प्रतिसाद बघता एनडीला विशेषत: भाजपला आत्मचिंतन करावे लागणार एवढे मात्र नक्की कारण पाटणा येथे झालेल्या पहिल्या बैठकीला 16 पक्ष एकत्र आले होते तर बेंगळुरू येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीला 26 पक्ष इंडिया आघाडीत आले होते. आता मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीला आणखी पक्ष वाढणार का? तसेच या बैठकीत काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील या बैठकीचे यजमानपद हे उध्दव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेले आहे, जे कधी काळी भाजपचे सर्वात जवळचे मित्र होते.
सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात उध्दव ठाकरे हे आघाडीवर आहेत. देशातील जनतेचा नूर पाहता आणि काही सर्व्हे बघता भाजपप्रणीत एनडीला पुन्हा सत्ता मिळेल इतकी खासदार संख्या दाखवण्यात आलेली असली तरी भाजपला नेमक्या किती जागा मिळणार याबाबत तरी अद्याप अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. जे कट्टर भाजप विरोधी आहेत त्यात काँग्रेस असेल शिवसेना असेल त्यांचं एकच म्हणणे आहे एनडीएची सत्ता आली तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळता कामा नये. बहुमत मिळाले नाही तर एनडीएतील सहभागी पक्ष नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी विरोध करू शकतात अन्यथा एनडीएतील हे पक्ष ऐनवेळी इंडिया आघाडीकडे उडी मारू शकतात. कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणूका बघता कुमारस्वामी यांच्या जनता दलाला लोकांनी नाकारले कारण जर त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली असती आणि गेम चेंजर म्हणून जनता दलाला महत्त्व आले असते आणि जनता दलाने भाजपला पाठिंबा दिला असता. भाजपप्रणीत एनडीएमध्ये 38 पक्ष तर भाजपविरोधी इंडिया आघाडीत 26 राजकीय पक्ष आहेत. कर्नाटकमध्ये कुमारस्वामींना जनतेने नाकारल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत थेट कर्नाटकमधील यश हे राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे मिळाले असल्याचे सांगितले तर सध्या राज ठाकरे हे राज्यातील प्रश्नावर आक्रमक झाले असून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावऊन त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरच निशाणा साधला.
देशात आणि राज्यात सध्या निवडणूकांचे वातावरण आता तयार होऊ लागले आहे. महाराष्ट्रात शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याबाबतची सहानुभुती कायम असल्याने भाजपसाठी ही चिंतेची बाब आहे. मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणूकांवऊनही कधी नव्हे ते राजकारण केले जात आहे. पावशा नावाचा एक पक्षी आहे, त्याला पावसाच्या आगमनाची सूचना मिळते तसेच राजकारणात काय होऊ शकते याचा अंदाज छोट्या मोठ्या पक्षांना येत असतो कारण राजकारणात मोठ्या पक्षांच्या बेरजेच्या राजकारणात सर्वाधिक अन्याय हा या छोट्या पक्षांवर होत असतो.
गेल्या आठवड्यात रासपचे महादेव जानकर यांनी राजकारणातील लाभार्थी गट जो स्वत:ला पुढारी म्हणवतो आणि पांढरे कपडे घालून फिरतो तो जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असला तरी त्या पक्षाचा मतदार हा उध्दव ठाकरे आणि शरद पवारांसोबत असल्याचे जानकर म्हणाले. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या गटात शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि पेणचे माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांचा झालेला पक्षप्रवेश सर्व काही सांगून जातो.
यापूर्वी उध्दव ठाकरे हे भाजपसोबत असताना फक्त मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील राजकारण यापुरतीच भूमिका घेत होते. राष्ट्रीय पातळीवर भाजप जी भूमिका घ्यायची त्याला मम म्हणायचे काम करत होती, आता थेट एनडीए विरोधी आघाडीचे नेतृत्व उध्दव ठाकरे करत आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत सर्व पक्षांचा योग्य तो समन्वय करण्याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती अकरा जणांची असणार आहे. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडणार यावर चर्चा होणार आहे. सोबतच इंडिया लोगोचं लाँचिंग होणार आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा कसा असेल या संदर्भात चर्चा होईल. प्रत्येक राज्यातील कोणते स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात घ्यायचे यावर चर्चा केली जाणार असल्याने आणि मुंबईत पहिल्यांदा सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे एकत्र येणार असल्याने मुंबईतील इंडियाच्या या बैठकीकडे भारताचे लक्ष लागले आहे.
प्रवीण काळे








