वृत्तसंस्था/ नागपूर
9 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ कसून सराव करीत असून संघाने क्षेत्ररक्षणावर विशेषतः स्लिपमधील क्षेत्ररक्षणावर जास्त भर दिला असल्याचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले.
‘गेल्या काही काळापासून भारताचे स्लिपमधील क्षेत्ररक्षण हा चिंतेचा विषय बनला असून सराव शिबिरात स्लिप कोंडाळय़ातील क्षेत्ररक्षण बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जण चांगल्या स्थितीत दिसत आहे. कसोटीसाठी ते पुन्हा एकत्र येताहेत ही चांगली बाब आहे. या खेळाडूंचा गेले महिना-दीड महिनाभर मर्यादित षटकांच्या क्रिकेटवरच जास्त वेळ गेला आहे. त्यापैकी काहीजण पांढऱया चेंडूकडून पुन्हा लाल चेंडूकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांनी जास्त वेळ सरावात घालविला. खेळपट्टीही खूप चांगली वाटत आहे,’ असे द्रविड म्हणाले. गुरुवारपासून सुरू होणाऱया कसोटीसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर घेतले जात आहे. कसोटी सामना व्हीसीए जामठा स्टेडियमवर होणार आहे.
क्षेत्ररक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून क्लोज इन कॅचिंग या मालिकेत खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे स्लिप फिल्डिंग, क्लोज इन कॅचिंग व यासारख्या अन्य बाबीवर जास्त भर देऊन लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बाबीवर इतर वेळी लक्ष देण्यासाठी क्वचितच वेळ मिळत असतो, असेही द्रविड म्हणाले. जवळपास वर्षभर भारतीय संघ सतत खेळत असल्याने त्यांच्यासोबत काम करण्यासाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या मालिकेआधी एक आठवडय़ाचा कालावधी सरावासाठी मिळाला आणि त्यात खेळाडूंशी संवाद साधण्याची संधीही मिळाल्याचे ते म्हणाले.

आमचे दोन वेळा सरावाचे दीर्घ सेशन्स झाले. भरगच्च क्रिकेटमुळे कोचिंग स्टाफला खेळाडूंसमवेत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या शिबिराचा आम्हाला चांगला लाभ झाला, असे वाटते. या चार-पाच दिवसात काय करायचे, याचे नियोजन आम्ही महिनाभर आधीपासूनच सुरू केले होते. या सराव सत्राचा आम्हाला खरोखरच चांगला लाभ घेता आला, याचा आनंद वाटतो, असे द्रविड म्हणाले.
ऑस्ट्रेलिया व भारत आयसीसी कसोटी संघांच्या व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मानांकनात पहिल्या व दुसऱया स्थानावर असून नागपूर कसोटीनंतर या दोन संघांत नवी दिल्ली (17-21 फेब्रुवारी), धरमशाला (1-5 मार्च) व अहमदाबाद (9-13 मार्च) येथे उर्वरित कसोटी खेळविल्या जाणार आहेत.
‘माझ्या दृष्टीने हे अल्पसे सराव शिबिर असले तरी मला दीर्घकाळ शिबिर घेणे आवडते. कारण त्यात अनेकांशी बराच काळ सुसंवाद साधता येतो. मात्र येथे पाच-सहा दिवस सरावासाठी मिळाले, हेही नसे थोडके, असे वाटते. या शिबिराचा चांगला लाभ झाला असून कसोटीआधी आणखी दोन-तीन दिवस मिळतील अशी आशा वाटते,’ असे द्रविड पुढे म्हणाले.
1996-97 मध्ये भारताने पहिल्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भाग घेतला असून मागील तीन मालिका (2017, 2018-19, 2020-21) भारतानेच जिंकल्या आहेत. त्यामुळे ही ट्रॉफी भारताकडेच असून यावेळची मालिका जिंकल्यास सलग चौथ्यांदा या दोन संघांतील मालिका जिंकणारा पहिला संघ होण्याचा भारतीय संघ मान मिळवेल.
जखमी हॅझलवुडला पहिली कसोटी हुकणार
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हॅझलवुड घोटय़ाच्या मागील शिरेला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याने पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही, तर दुसऱया कसोटीतील त्याच्या सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. 32 वर्षीय हॅझलवुडच्या डाव्या पायाला गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनीत झालेल्या सामन्यात ही दुखापत झाली होती. ‘पहिली कसोटी काही दिवसांवर असली तरी दुखापत लवकर बरी होत आहे. त्यामुळे कदाचित दुसऱया कसोटीत मी खेळू शकेन, अशी आशा वाटते,’ असे बेंगळूरमधील ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रानंतर बोलताना तो म्हणाला.









