आरआरटीएस टेनचे पंतप्रधान मोदी करणार आज उद्घाटन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाच्या पहिल्या रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या रेल्वेगाड्यांना आता ‘नमो भारत’ या नावाने ओळखले जाणार आहे. या रेल्वेसेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर 21 ऑक्टोबरपासून आरआरटीएस कॉरिडॉरचा पहिला हिस्सा प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. नव्या ‘रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ रेल्वेगाड्यांना ‘नमो भारत’ या नावाने ओळखले जाणार आहे. दिल्ली-गाजियाबाद-मेरठ या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या आरआरटीएस कॉरिडॉरचा 17 किलोमीटर लांबीचा हिस्सा शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
भारतात आरआरटीएसची सुरुवात करत साहिबाबाद आणि दुहाई डेपोलो जाणाऱ्या एका रॅपिडएक्स ट्रेनला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. दिल्ली-गाजियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा 17 किलोमीटर लांबीचा पहिला हिस्सा गाजियाबाद, गुलधर आणि दुहाई स्थानकांद्वारे साहिबाबादला दुहाई डेपोशी जोडणार आहे. आरआरटीएस 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार असून उच्च गतीसह क्षेत्रीय प्रवासाची सुविधा प्रदान करणारी प्रणाली आहे. ही एक परिवर्तनकारी क्षेत्रीय विकास पुढाकार असून यात शहरांतर्गत प्रवासासाठी दर 15 मिनिटाला उच्च वेग असणारी रेल्वे उपलब्ध असणार आहे. आवश्यकतेनुसार दर 5 मिनिटांनी देखील ही रेल्वेसेवा उपलब्ध होऊ शकते. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एकूण 8 आरआरटीएस कॉरिडॉरची ओळख पटविण्यात आली असून यात पहिल्या टप्प्यात दिल्ली-गाजियाबाद-मेरठ, दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अल्वर आणि दिल्ली-पानीपतच्या अंमलबजावणीला प्राथमिकता देण्यात आली आहे.









