सुनील कुमार : कांस्य, अनाहत सिंग-उबय सिंग : स्क्वॅशमध्ये कांस्य, मंजू राणी-राम बाबू : रेसवॉकमध्ये कांस्य
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
भारताचा कुस्तीपटू सुनिल कुमारने 87 किलो वजनीगटात कांस्यपदक जिंकले. त्याने कझाकिस्तानच्या अताबेकचा 2-1 असा पराभव केला. विशेष म्हणजे, 2010 नंतर ग्रीको रोमन प्रकारात भारताचे पहिलेच पदक आहे. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या कझाकच्या अताबेकने सुनीलकुमारला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय, भारताने स्क्वॅश मिश्र दुहेरीमध्ये भारतीय जोडीने कांस्यपदक जिंकले. भारताची स्क्वॉश जोडी अनहत सिंग आणि अभय सिंग यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश करत आपले कांस्यपदक निश्चित केले होते. त्या पदकाचा रंग बदलण्यासाठी, त्यांना आज मलेशियाच्या बिनती आणि सयफिकचा पराभव करणे गरजेचे होते. भारतीय जोडीने आपला पहिला गेम 11-8 असा जिंकत आघाडी देखील घेतली होती. मात्र मलेशियाच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसरा गेम 11-2 अशा मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने थोडी झुंज दिली. मात्र मलेशियाने तिसरा गेम देखील 11-9 असा जिंकत रौप्यपदक निश्चित केले तर भारताला कांस्यपदक मिळाले.
तसेच, बुधवारच्या दिवसाची सुरुवात मंजू राणी आणि राम बाबू यांनी 35 किमी रेस वॉक मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला दिवसातील पहिले पदक मिळवून देत केली. या जोडीने कांस्यपदक जिंकले.









