वृत्तसंस्था / लखनौ
विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांच्या विरोधात आयएनडीआयए ही आघाडी स्थापन केली आहे. सत्तधारी आघाडीची आणि या आघाडीची थेट स्पर्धा अद्याप कोणत्याही महत्वाच्या निवडणुकीत झालेली नाही. तथापि, उत्तर प्रदेशातील घोशी मतदारसंघात लवकरच ती होणार आहे.
2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले दारासिंग चौहान आता पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार या नात्याने घोशी मतदारसंघात 2022 मध्ये विजय मिळविला होता. त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 5 सप्टेंबरला मतदान होणार आहे. भाजपच्या वतीने या निवडणुकीत दारासिंग चौहान यांनाच उभे करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाच्या वतीने सुधाकर सिंग हे स्पर्धेत आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा घोषित केला आहे.
या मतदारसंघात भाजपने सर्वात आधी प्रचाराला प्रारंभ केला आहे. भाजपच्या वतीने ओमप्रकाश राजभर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री अजय शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून याच मतदारसंघात वास्तव्य करुन आहेत. दारासिंग चौहान हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघात 8 सप्टेंबरला परिणाम घोषित करण्यात येणार आहे. ही विधानसभा पोटनिवडणूक असली तरी तो दोन्ही आघाड्यांमधील प्रथम संघर्ष असल्याने त्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.









