वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतात पहिली डायबेटिस (मधुमेह) बँक चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली आहे. या बायोबँकच्या माध्यमातून मधुमेहावरील आजाराच्या उपचारात प्रगती करण्याचा विचार आहे. चेन्नईतील मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनने (एमडीआरएफ) नवी दिल्लीस्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) सहकार्याने ही बायोबँक सुरू केली आहे. यामुळे मधुमेहावर संशोधन करणे आणि नवीन बायोमार्कर्स ओळखणे सोपे होणार आहे. तसेच, रुग्णांचे जैव नमुने दीर्घकाळ बँकेत सुरक्षित ठेवले जाणार आहेत. फाऊंडेशनचे डॉ. विश्वनाथन मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाची कारणे आणि त्याच्या गुंतागुंतीचा शोध घेण्यासाठी लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षणातून मिळालेले सुमारे 75 हजार रक्त नमुने, 10 हजार सीरम नमुने, 16 हजार अनुवांशिक नमुने आणि पाच हजार युरीनचे नमुने येथे जतन करण्यात आले आहेत.









