भारतावर निर्बंधांसाठी युरोपीय देशांवर दबाव : ट्रम्प यांना हवा नोबेल पुरस्कार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर चिडले आहेत. स्वत:च्या आश्वासनानुसार ट्रम्प हे आतापर्यंत रशिया-युक्रेन युद्ध रोखू शकलेले नाहीत आणि याचे खापर त्यांनी भारतावर फोडण्यास सुरुवात केली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असल्याने रशियाला आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा अजब दावा ते करत आहेत. याच दाव्यांतर्गत ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के आयातशुल्क लादले आहे. परंतु तरीही भारत ठाम राहिल्याने ट्रम्प आता युरोपीय देशांवर भारतीय उत्पादनांवर आयातशुल्क लादण्यासाठी दबाव टाकत आहेत.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याप्रकरणी भारतावर अमेरिकेसारखे निर्बंध लादावेत असे व्हाइट हाउसने युरोपीय देशांना सांगितले आहे. युरोपीय नेते देखील युक्रेन युद्ध समाप्त करविण्याच्या बाजूने आहेत. परंतु भारत रशियन कच्चे तेल खरेदी करत नफा कमावत असल्याच्या अमेरिकेच्या दाव्याला त्यांनी मान्य केलेले नाही. युरोपीय देशांनी या मुद्द्यावर बऱ्याचअंशी मौन बाळगले असून ट्रम्प यांच्या आयातशुल्काचे उघड समर्थन किंवा विरोध केला नाही.
ट्रम्प नाराज का?
अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 7-10 मे या कालावधीत झालेला संघर्ष रोखल्याचा दावा वारंवार केला आहे. पाकिस्तानने ट्रम्प यांच्या दाव्याला मान्य करत त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणीही केली आहे. तर भारताची भूमिका याप्रकरणी अत्यंत वेगळी राहिली आहे. पाकिस्तानसोबतचा संघर्ष रोखण्यात कुठल्याही त्रयस्थ देशाची भूमिका नाही. डीजीएमओ स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षविरामावर सहमती झाल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. भारताच्या या स्पष्टोक्तीमुळेच ट्रम्प हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.









