सॅफ यू-19 महिलांची फुटबॉल स्पर्धा
वृत्तसंस्था/ ढाका
‘सॅफ’ 19 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा संघ आज 7 रोजी येथील बीएसएसएसएमके स्टेडियमच्या कृत्रिम टर्फवर यजमान बांगलादेशशी भिडणार आहे. महिला फुटबॉलमध्ये लक्षणीय सुधारणा होत असली, तरी भारताची ‘सॅफ’मधील (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) या वयोगटातील स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे.
एकापेक्षा जास्त प्रसंगी या विजेतेपदाने भारताला हुलकावणी दिलेली आहे. याचे ताजे उदाहरण गेल्या वर्षी ढाका येथे झालेल्या 20 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेचे आहे. त्यात बांगलादेशने भारताला हरवून चषक जिंकला होता. आजची अंतिम लढत ही भारताच्या दृष्टीने भूतकाळातील निराशा पुसून टाकण्याची आणि विजेतेपद मिळविण्याची मोठी संधी असेल. निश्चितपणे जेतेपद पटकावण्याच्या दृढनिश्चयाने भारतीय महिला खेळाडू अंतिम सामन्यात उतरतील.
गट स्तरावर भारताने भूतान (10-0) आणि नेपाळ (4-0) यांच्याविऊद्ध आरामात विजय मिळवला, परंतु बांगलादेशविऊद्ध त्यांना एकमेव गोलाच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे गटात त्यांना दुसरे स्थान प्राप्त झाले. तगडा बचाव आणि संतुलित मध्यफळी असण्याव्यतिरिक्त पूजा आणि सुलंजना राऊल तसेच विंगर नेहा आणि सिबानी देवी यांचा समावेश असलेल्या आक्रमक आघाडीफळीने प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे.
सर्व सकारात्मक चिन्हे असली, तरी यजमानांना पराभूत करणे सोपे जाणार नाही हे भारताच्या मुख्य प्रशिक्षक शुक्ला दत्ता यांना चांगलेच माहीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारत बांगलादेशच्या हातून हरत आला आहे, पण आज ते बदलण्याची वेळ येईल. मला खात्री आहे की, दोन्ही संघ समान प्रयत्न करतील, परंतु जो संघ प्रथम गोल करेल तो विजेता बनण्याची शक्यता आहे, कारण अधिक गोल करण्याचा आत्मविश्वास त्यातूनच मिळतो, असे शुक्ला यांनी सांगितले.
मला माहीत आहे की बांगलादेशला मोठा पाठिंबा असेल, परंतु आम्ही फक्त आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करू, असे त्या म्हणाल्या. गट स्तरावर बांगलादेशविऊद्ध आधीच संघ खेळलेला असल्याने मुख्य प्रशिक्षक शुक्ला यांना परिस्थिती कशी हाताळायची ते माहीत आहे. आम्ही या स्पर्धेत यजमानांविऊद्ध एक सामना खेळला आहे, त्यामुळे ते कसे खेळतात हे आम्हाला ठाऊक आहे. तो एक चांगला संघ आहे यात शंका नाही. मी माझ्या खेळाडूंना त्यांच्या स्थानावर लक्ष केंद्रीत करून ‘मार्किंग’ला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत’, असे त्या म्हणाल्या.









