खत मंत्रालयाच्या आकडेवारीमधून माहिती
नवी दिल्ली
वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये देशातील खताची आयात 3.9 टक्क्यांनी वाढली असून या वाढीसोबत ती 19.04 लाख टन झाल्याची माहिती खत मंत्रालयाने दिली आहे. जानेवारी 2022 मध्ये देशाने 18.33 लाख टन खताची आयात केली होती.
ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 19.04 लाख टन आयातीमध्ये 10.65 लाख टन युरिया, 5.62 लाख टन डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी), 1.14 लाख टन म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) आणि 1.63 लाख टन आदी खतांचा समावेश असल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात देशाने 12.48 लाख टन युरिया, 2.45 लाख टन डीएपी आणि 3.40 लाख टन एमओपी आयात केले होते. यामध्ये कृषी आणि औद्योगिक दोन्ही वापरासाठी एमओपी आयात करण्यात आले.
या वर्षीच्या जानेवारीत देशांतर्गत खतांचे उत्पादनही 39.14 लाख टन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 32.16 लाख टन होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात खत किमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतीत घसरण होत असल्याचे चित्र आहे. युरियाच्या किमती (मालवाहतुकीनंतर) 44.26 टक्क्यांनी घसरून या वर्षी जानेवारीत 500 डॉलर प्रति टनवर आल्या आहेत, गेल्या वर्षी याच कालावधीत त्या 897 डॉलर प्रति टन होत्या.









