चॅम्पियन्स ट्रॉफीची सुऊवात भारतासाठी तर छान झाली आहे. करोडो भारतीयांसाठी जे अपेक्षित होतं तेच घडलं. गंमत बघा, हा सामना सुरू होण्याअगोदर बांगलादेशचा कर्णधार शांतो गरजला होता की आम्ही स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी आलो नाही तर आम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोत. परंतु त्याची गर्जना मात्र पहिल्याच सामन्यात हवेत विरली. नाणेफेक जिंकत पहिले ‘हम’ म्हणण्याचा निर्णय भलताच अंगाशी आला. पहिल्या दहा षटकात बांगलादेश भांबावलेला दिसला. परीक्षेला मराठीच्या पेपरची तयारी करायची आणि अचानक इंग्रजीचा पेपर हाती आल्यानंतर परीक्षार्थी जसा भांबावतो, अगदी तसा.
पहिल्या दहा षटकात पाच बाद 35 अशी अवस्था बघून मला 1983 वर्ल्ड कपमधील भारत विऊद्ध झिंबाब्वे सामन्याची आठवण झाली. त्या सामन्यात भारत सुऊवातीलाच पाच बाद 17 होता. त्यानंतर कपिल देवची विश्वविक्रमी खेळी आपण अनुभवली होती. इथेही काही विक्रम होतोय का? ही शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. परंतु सुदैवाने तसं काही घडले नाही. ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुशील दोषी नेहमी म्हणतात, जे स्वप्नात दिसत नाही ते क्रिकेटमध्ये नेहमी घडतं. बघाना, हॅट्ट्रिकची संधी असताना रोहित शर्माने सोडलेला तो झेल. क्रिकेटचा चेंडूही ज्याने हातात धरला नाही त्यांनीही तो झेल घेतला असता. क्रिकेटच्या मैदानात काही दृश्यं सारखीच असतात परंतु वेगवेगळ्या सामन्यात त्याचा मथितार्थ बदलत असतो. काही महिन्यांपूर्वीच टी-20 कप जिंकल्यानंतर दस्तुरखुद्द रोहित शर्माने जमिनीवर जोराने हाताचा तळवा आपटून आपला आनंद व्यक्त केला होता. नेमकी तीच कृती काल केली. त्यामागे दु:ख, अपराधीपणा लपला होता. क्रिकेट म्हणजे काय? त्याचे उत्तर काल आपल्याला रोहितच्या कृतीतून दोन वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळाले. सरते शेवटी रोहितने हात जोडून अक्षर पटेलची माफीही मागितली. पण बिरबलाच्या भाषेत म्हणतात ना, ‘जो बूंद से गई वो हौद से नही आती.’
पहिल्या दहा षटकात बांगलादेशचा संघ कोमात होता. त्याला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली ती जाकेर अली आणि तौहीद हृदोय या जोडीने. बांगलादेशचा संघ 7 च्या आत पाकिस्तानला फ्लाईटने पोहोचतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पहिल्या दहा षटकात बांगलादेशचा एकही असा फलंदाज नव्हता जो पाय रोवून फलंदाजी करू शकेल. याला इंग्लंड क्रिकेटमध्ये बेड अँड ब्रेकफास्ट बॅटिंग असे म्हणतात. असो. भारताच्या फलंदाजीचा विचार केला तर गिल काल भाव खाऊन गेला. त्याने आपल्या फलंदाजीचा गिअर अगदी पद्धतशीरपणे वर- खाली केला. पहिल्या गिअरवरून त्याने तिसरा गिअर कधी टाकला नाही. सर्व कसं झटपट क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटची आठवण कऊन देणारं. शमीने ’पंजा’ खोलत मलाही कधीतरी गळ्यातलं ताईत बनवा, असं तो ठणकावून सांगत असावा. क्रिकेटमध्ये गोलंदाजांची परिस्थिती हॉकी आणि फुटबॉलमधल्या गोलकीपरसारखी आहे. गोल किती वाचवले यापेक्षा गोल किती दिले हे बघितले जाते. तीच परिस्थिती गोलंदाजांची. शमीने पन्नास धावा दिल्या खऱ्या परंतु पाच महत्त्वपूर्ण बळी मिळवले तेही सामन्याच्या सुऊवातीला खिंडार पाडत. दोन वर्षांपूर्वी मोहम्मद शमी याच्या गोलंदाजीकडे गंजलेल्या कुऱ्हाडीप्रमाणे बघितले जायचे. अचानक 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये सोनेरी मुलामा घेऊन त्याने गोलंदाजी केली. आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेत मीच 24 कॅरेट सोनं आहे हेच तो पहिल्याच सामन्यात ठणकावून सांगतोय. असो.
बांगलादेशच्या मंदगती गोलंदाजांचं मी कौतुक करेन. त्यांच्या पाकिटात धावारूपी पैसे त्यांच्या वॉलेटमध्ये नव्हते. रेस्टॉरंटमध्ये मेनू कार्डच्या डाव्या बाजूला पहात जशी एखाद्याने मोठी ऑर्डर करावी तशी ते खेळपट्टीवर मर्यादित धावसंख्या असून सुद्धा जवळपास शेवटपर्यंत काही प्रमाणात का होईना जखडून ठेवलं. या पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने भविष्यात झटपट क्रिकेटचं भवितव्य ठरणार आहे. त्यात भारताची कामगिरी काय असणार आहे हे महत्त्वाचं आहे. भारतीय संघाने पाया तर छान रचलाय, बघायचे यावर किती मोठी इमारत रचली जाते. हा लेख लिहीत असताना माझे परममित्र गजाभाऊंचा फोन आला. त्यांनी मला सहज प्रश्न केला की ‘ती’ जखम तुमची भरली का? मी लगेच हजरजबाबीपणा दाखवत म्हणालो, जखमही भरली आणि व्रणही मिटले.









