नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने म्हटले आहे की, चालू दशकात भारताची उर्जेची मागणी जगात सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. ‘वर्ल्ड एनर्जी आऊटलूक’ मध्ये, त्यांनी म्हटले आहे की शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भारताची ऊर्जा मागणी वार्षिक तीन टक्के दराने आगामी काळात वाढणार आहे. अक्षय उर्जेवर भर दिल्याने, विजेच्या वाढलेल्या मागणीतील या विभागाचा वाटा 60 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे, 2030 पर्यंत एकूण उर्जेच्या मागणीमध्ये कोळशाचा वाटा 30 टक्के असण्याचा अंदाज आहे, तर मागणीच्या एक तृतीयांश मागणी पेट्रोलियम उत्पादनांमधून पूर्ण केली जाईल.
या अहवालानुसार, 2025 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल आणि शहरीकरण तसेच औद्योगिकीकरणाच्या दुहेरी शक्तींमुळे येथे ऊर्जा मागणी सर्वात वेगाने वाढेल. ही वाढ वार्षिक आधारावर तीन टक्क्यांहून अधिक असेल. ही वाढ कोणत्याही देशाच्या उर्जेच्या मागणीतील सर्वात मोठी वाढ असेल, असे अहवालात म्हटले आहे. नवीकरणीय उर्जेवर आणि ऊर्जा कार्यक्षमतेचा अवलंब करण्यावर भारताचा भर असूनही, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व वाढले असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.









