आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला अंदाज
नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांनी कमी केला आहे. आयएमएफचा हा अंदाज इतर विकास बँकांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे भाकीत आहे. जागतिक बँकेने 2023-24 साठी भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के आणि आशियाई विकास बँकेने 6.4टक्के राहण्याचा अंदाज मांडला आहे.
आयएमएफचा अंदाज आहे की, 2023 मध्ये जागतिक वाढ 2.8 टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि पुढील वर्षी ती 3 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचेही म्हटले आहे. त्याच वेळी, क्रयशक्तीच्या क्षमतेच्या दृष्टीने भारताची दरडोई उत्पन्नातील वाढ आर्थिक वर्ष 2023 मधील 5.8 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 4.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
चलनवाढ आणि तूट यांची चिंता व्dयाक्त होते आहे. आयएमएफने आपल्या ताज्या द्विवार्षिक जागतिक आर्थिक आऊटलूकमध्ये भारताची किरकोळ चलनवाढ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 4.9 टक्क्यांवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 6.7 टक्क्यांवर होता. तसेच, भारताच्या चालू खात्यातील तूटीचा अंदाज 2.6 टक्क्यांच्या जीडीपीवरून तो 2.2 टक्के इतका कमी केला आहे.









