वृत्तसंस्था / ग्वांगजु (द.कोरिया)
येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या 15 वर्षीय गाथा खडकेचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात कोरियाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिहेरी सुवर्णपदक मिळविणाऱ्या लीम सी हेयॉनने गाथा खडकेचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. भारताने रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात आपले शेवटचे पदक 2019 साली झालेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत पटकाविले होते. डेन बॉश्च येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या तरुणदीप राय, अतेनु दास आणि प्रवीण जाधव यांनी पुरूषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. भारताच्या दीपिका कुमारीला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हा पत्करावी लागली. भारताचा पुरूष तिरंदाजपटू धिरज बोमादेवराला पात्र फेरीतच हार मानावी लागली. या स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाजपटूंनी केवळ कंपाऊंड प्रकारात पदक मिळविले आहे. पुरूषांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताला ऋषभ यादव, प्रथमेश फुगे आणि अमन सैनी यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात ऋषभ यादव, सुरेखा व्हेनाम यांनी रौप्य पदक पटकाविले.









