वृत्तसंस्था/ लंडन
एफआयएच प्रो लीग महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला येथे झालेल्या सामन्यात अर्जेन्टिनाकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला.
दीपिकाने 30 व्या मिनिटाला मारलेल्या जबरदस्त ड्रॅगफ्लिकवर भारताला मध्यंतराआधी बरोबरी साधून दिली. त्याआधी 29 व्या मिनिटाला क्हिक्टोरिया फालास्कोने अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र अर्जेन्टिनाने नंतर सफाईदार प्रदर्शन करीत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले. ऑगस्टिना गोर्झेलॅनीने 42, 54, 55 व्या मिनिटाला तीन गोल नोंदवत अर्जेन्टिनाचा विजय निश्चित केला. भारताने या सामन्यात अनेक आक्रमक चाली रचत गोलच्या संधी निर्माण केल्या. पण त्या थोडक्यात हुकल्याचे पहावयास मिळाले.
पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. मात्र तीनदा गोलच्या दिशेने फटके मारल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावला. सलिमा टेटे व लालरेमसियामी या दोघींनाही गोलकोंडी फोडण्याची संधी मिळाली होती. भारताने शानदार व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत छोटे पासेस देत चेंडूवर ताबा घेतच आगेकूच केली. दुसऱ्या सत्रात अर्जेन्टिनाने जलद हालचाली करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण नवनीत कौरने गोललाईनजवळ स्टिकने शानदार बचाव करीत भारतावरील हा धोका टाळला. भारतानेही प्रतिआक्रमण करताना सलिमा टेटेने उजव्या बगलेतून आगेकूच केली आणि बलजीत कौरकडे तिने पास पुरविला. पण तिचा फटका वाईड गेला. 29 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाने आघाडी घेण्यात यश मिळविले. व्हिक्टोरिया फालास्कोने सर्कलमध्ये चेंडूवर ताबा घेत जोरदार फटका मारत हा गोल नोंदवला. भारतानेही आक्रमण तेज करीत बरोबरीसाठी प्रयत्न केले. हें सत्र संपण्यास काही सेकंद असताना भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि दीपिकाने त्यावर अचूक गोल नोंदवत बरोबरी साधली,.
उत्तरार्धात सुरुवातीलाच भारताला गोलची सुवर्णसंधी मिळाली होती,. पण सलिमा टेटेचा सर्कलमधून मारलेला फटका अर्जेन्टिनाच्या गोलरक्षकाने अचूक थोपवल्याने ही संधी वाया गेली. नंतर नवनीतचा एक प्रयत्नही असाच वाया गेला. भारताने आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण भक्कम बचाव करीत अर्जेन्टिनाने ते फोल ठरविले. 42 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर गोर्झेलॅनीने अचूक गोल केला. 54 व्या मिनिटालाही तिनेच पेनल्टी स्ट्रोकवर आणखी एक गोल केला आणि 55 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत मोठा विजय साकार केला.









