वृत्तसंस्था/ झुरीच
विश्व फुटबॉल फेडरेशनतर्फे (फिफा) घोषित ताज्या मानांकन यादीत भारताचे स्थान दोन अंकांनी घसरले. या फिफाच्या मानांकन यादीत भारत सध्या 106 व्या स्थानावर आहे. ब्राझीलने आपले आघाडीचे स्थान कायम राखले.
फिफाची आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात कतार येथे खेळविली जाणार आहे. ताजी मानांकन यादी घोषित करण्यापूर्वी एकूण विविध 53 देशांच्या लीग स्पर्धेतील सामने तसेच 119 मित्रत्वाच्या आंततराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये कोणताही बदल झाला नाही.
ब्राझीलने आपले आघाडीचे स्थान भक्कम राखले आहे. बेल्जियम दुसऱया आणि अर्जेंटिना तिसऱया, फान्स चौथ्या आणि इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावर इटलीला पात्र फेरी स्पर्धेत आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. गेल्या महिनयात झालेल्या नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने इटलीवर 1-0 असा विजय मिळविला होता. या ताज्या मानांकन यादीत वेल्सने 19 वे स्थान मिळविले आहे. अमेरिका 16 व्या, इराण 20 व्या स्थानावर आहे. 2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे.









