आशिया चषक स्पर्धेत पाकचा उडवला धुव्वा : सामनावीर कुलदीप यादवचे 3 बळी
वृत्तसंस्था/ दुबई
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानवर क्रिकेटमधील सर्जिकल स्ट्राईक केला. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या या ऑपरेशन सिंदूरच्या पुढील भागामध्येही भारत यशस्वी ठरला. मैदान कोणतेही असो, सरस कोण आहे, हे भारताने पुन्हा जगाला दाखवून दिले. कुलदीप यादव, बुमराह आणि अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला 20 षटकांत 127 धावा करता आल्या. यानंतर विजयासाठीचे माफक आव्हान टीम इंडियाने 15.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पार करत शानदार विजय मिळवला.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकने विजयासाठी दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने भारताला धमाकेदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिल मात्र स्वस्तात बाद झाला. त्याला यावेळी 10 धावांवर समाधान मानावे लागले. पण अभिषेकने यावेळी 13 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 31 धावांची दमदार खेळी साकारली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताचा विजय सुकर केला. तिलक वर्मा बाद झाल्यावर सूर्या आणि शिवम दुबे या जोडीने 56 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सूर्याने शानदार खेळी साकारताना 37 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 47 धावा केल्या. तिलकने त्याला चांगली साथ देताना 31 धावांचे योगदान दिले. याशिवाय, दुबे 10 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाने विजयी लक्ष्य 15.5 षटकांत पूर्ण करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सईम आयुब आणि साहिबजादा फरहान सलामीला फलंदाजीला आले. हार्दिक पंड्याने पहिल्या षटकात गोलंदाजी केली. पहिला चेंडू वाईड झाला. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर आयुबचा झेल बुमराहने घेतला. सईमला भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सामन्याच्या पहिल्याच वैध चेंडूवर विकेट घेणारा हार्दिक अर्शदीप सिंगनंतरचा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला. अर्शदीपने 2024 मध्ये यूएसएविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये असा कारनामा केला होता.
कुलदीपचा जलवा, बुमराहची भेदक गोलंदाजी
यानंतर फलंदाजीला आलेला मोहम्मद हॅरिसला दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने माघारी धाडले. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर हॅरिसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वर उंच उडाला, यावेळी हार्दिक पळत आला आणि त्याने सहज हा चेंडू पकडला. हॅरिसला 3 धावा करता आल्या. यानंतर साहिबजादाला फखर झमानची साथ मिळाली. या दोघांनी काही काळ संघाचा डाव सावरला. फरहानने आक्रमक खेळ केला, पण अखेर 8 व्या षटकात अक्षर पटेलने त्याला माघारी धाडले. फखरने 15 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. 10 व्या षटकात अक्षरनेच पाकचा कर्णधार सलमान आगालाही (3) फार काळ टिकू दिले नाही. त्यानंतरही 13 व्या षटकात कुलदीप यादवने दोन चेंडूत दोन मोठे धक्के पाकिस्तानला दिले. त्याने हसन नवाज (5) आणि मोहम्मद नवाज (0) यांना बाद केले. त्याला हॅट्रिकचीही संधी होती, पण ती संधी हुकली.
विकेट जात असताना सलामीवीर साहिबजादा एका बाजूने सांभाळून खेळत होता. पण त्याचाही अडथळा कुलदीप यादवनेच 17 व्या षटकात दूर केला. साहिबजादाने 44 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारासह 40 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. यानंतर शाहिन आफ्रिदीने 2 षटकार मारत संघाला 100 धावांच्या आसपास पोहोचवले होते. शाहिनने 16 चेंडूत 4 षटकारासह 33 धावा फटकावल्या. यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकच्या इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 127 (साहिबजादा फरहान 40, फखर झमान 17, फहीम अश्रफ 11, शाहिन शाह आफ्रिदी नाबाद 33, सुफियान 10, कुलदीप यादव 18 धावांत 3 बळी, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल प्रत्येकी 2 बळी, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 1 बळी)
भारत 15.5 षटकांत 3 बाद 131 (अभिषेक शर्मा 31, शुभमन गिल 10, सूर्यकुमार यादव नाबाद 47, तिलक वर्मा 31, शिवम दुबे नाबाद 10, सईम आयुब 3 बळी).
सूर्याने हात न मिळवता पाक कर्णधाराकडे फिरवली पाठ
आशिया चषक स्पर्धाच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेतील मॅचमध्ये टॉसनंतर दोन्ही संघातील कर्णधार एकमेकांसोबत हस्तांदोलन करतात. क्रिकेटच्या मैदानात वर्षांनुवर्षे ही परंपरा चालत आली आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ही परंपरा मोडत भारतीयांच्या भावना जपल्याचे पाहायला मिळाले. टॉस झाल्यावर सूर्याने पाकिस्तानी कर्णधारासोबत हातमिळवणी करणे टाळले. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय, सूर्याने दणदणीत षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यानंतर सूर्या थेट हेल्मेट काढून ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालू लागला. यानंतर शिवम दुबेला थोडं पुढे गेल्यावर त्याने हात मिळवला. तर कोणताच भारतीय खेळाडू पाकिस्तान संघाबरोबर हात मिळवण्यासाठी पुढे मैदानात आला नाही.









