विंडीजविरुद्ध तिसरी वनडे लढत : इशान किशन, गिल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ तरूबा
भारत व विंडीज यांच्यातील तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 50 षटकांत 5 बाद 351 धावांचा डोंगर उभारत विंडीजसमोर कठीण आव्हान ठेवले. भारताची ही विंडीजमधील आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. इशान किशनने सलग तिसरे अर्धशतक (77) नोंदवले तर शुभमन गिल, संजू सॅमसन (51) व कर्णधार हार्दिक पंड्या (नाबाद 70) यांनीही अर्धशतके नोंदवली.
या निर्णायक सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने पुन्हा एकदा या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली तर उमरान मलिक व अक्षर पटेल यांच्या जागी ऋतुराज गायकवाड व जयदेव उनादकट यांना संधी दिली. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी साधल्याने या सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले होते.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशन व गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून देताना विंडीजच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला करीत चौफेर फटकेबाजी केली आणि पहिल्या गड्यासाठी 143 धावांची भक्कम सलामी दिली. गिलपेक्षा इशान जास्त आक्रमक खेळत होता. त्याने या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक नोंदवताना 64 चेंडूत 77 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. याआधीच्या दोन सामन्यात त्याने 52 व 55 धावा केल्या होत्या.
कॅरियाने ही जोडी फोडताना इशानला यष्टिचीत केले. पुढे सरसावत फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि यष्टिरक्षक व कर्णधार शाय होपने त्याला यष्टिचीत केले.

सॅमसनची आक्रमक खेळी
गिल-इशान जोडी फुटल्यानंतर ऋतुराज गायकवाडला मिळालेली संधी साधता आली नाही. केवळ 8 धावा काढून तो जोसेफच्या गोलंदाजीवर किंगकरवी झेलबाद झाला. 154 धावसंख्येवर भारताचा हा दुसरा गडी बाद झाला. संजू
सॅमसनने मात्र गिलला चांगली साथ दिली आणि आक्रमक फटकेबाजी करीत 41 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 51 धावा झोडपल्या. सुरुवातीला पायचीतच्या अपिलातून तो बचावला होता. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. गिल शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच मोतीच्या फसव्या चेंडूवर त्याने शॉर्ट मिडविकेटवरील कॅरियाकडे सोपा झेल दिला. त्याने 92 चेंडूत 85 धावा जमविताना 11 चौकार मारले.
हार्दिकचे आक्रमण
सूर्यकुमार यादव व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या टप्प्यात आक्रमक फटकेबाजी करीत संघाला तीनशेची मजल मारून दिली. सूर्यकुमार कॅरियाने टिपलेल्या अप्रतिम झेलवर बाद झाला. त्याने 30 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 35 धावा फटकावताना हार्दिकसमवेत 49 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. सूर्या बाद झाल्यावर जडेजाने हार्दिकला जास्त स्ट्राईक देण्याचे धोरण ठेवले. हार्दिकने चौकार, षटकारांची बरसात करीत 52 चेंडूतच नाबाद 70 धावा झोपडल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार, 5 षटकारांचा समावेश होता. जडेजा 8 धावांवर नाबाद राहिला. विंडीजच्या शेफर्डने 2, कॅरिया, मोती, जोसेफ यांनी एकेक बळी मिळविला. सील्स मात्र बराच महागडा ठरला. त्याच्या 8 षटकांत 75 धावा निघाल्या.
भारताने याआधी विंडीजमध्ये विंडीजविरुद्ध 6 बाद 339 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. या सामन्यात त्यांनी ती मागे टाकली.









