वृत्तसंस्था/ योगेयाकर्ता (इंडोनेशिया)
येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कनिष्ठ सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ बॅडमिंटन संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत यजमान इंडोनेशियाने भारताचा 3-1 अशा फरकाने पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या अॅड्रीयन आणि फेलिशा यांनी भारताच्या समरवीर आणि प्राधिका यांचा 21-16, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाच्या अल्वी फरानने भारताच्या आयुष शेट्टीवर 18-21, 21-15, 21-19 अशी मात करून आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या रक्षिता श्री हिने इंडोनेशियाच्या रुझानाचा 21-18, 10-21, 23-21 अशा गेम्स मात करत इंडोनेशियाची आघाडी 2-1 अशी कमी केली. शेवटच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या मोहमद आणि जोआक्वीन यांनी भारताच्या दिव्याराम आणि मयांक यांचा 21-10, 15-21, 21-12 असा पराभव केल्याने इंडोनेशियाने ही लढत 3-1 अशा फरकाने जिंकून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेतील सांघिक प्रकारात भारताचे आव्हान संपले असून आता या स्पर्धेतील वैयक्तिक गटातील सामन्यांना 12 जुलैपासून प्रारंभ होत आहे.









