भारताचा 48 धावांनी सहज विजय, ऋतुराज गायकवाड-इशान किशनची 97 धावांची भागीदारी
विशाखापट्टणम
सलामीवीर ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांची तडफदार अर्धशतके आणि हर्षल पटेल-चहल यांच्या एकत्रित 7 बळींमुळे भारताने तिसऱया टी-20 सामन्यात 48 धावांनी सहज
विजय संपादन केला. या सामन्यात भारताने 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 19.1 षटकात सर्वबाद 131 धावांवर आटोपला.
विजयासाठी 180 धावांचे आव्हान असताना क्लासेनने 29 तर हेन्ड्रिक्सने 23 धावा केल्या. मात्र, हर्षल पटेल व चहल यांनी एकत्रित 7 बळी घेत द. आफ्रिकन संघाला जोरदार सुरुंग लावला.

त्यापूर्वी, मधल्या टप्प्यात पडझड झाल्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 179 धावांवर समाधान मानावे लागले. खराब फॉर्ममुळे टीकेच्या केंद्रस्थानी राहत आलेल्या गायकवाडला अखेर या सामन्यात सूर सापडला आणि त्याने 35 चेंडूत 57 धावा केल्या. किशनने 5 सामन्यांच्या या मालिकेत दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले.
ऋतुराज व इशान किशन यांनी 10 षटकात 97 धावांची जोरदार सलामी दिली असली तरी यानंतरही भारताला 200 धावांचा टप्पा पार करता आला नाही. 13 ते 17 षटकादरम्यान त्यांना केवळ 20 धावा जमवता आल्या आणि यासाठीही 2 फलंदाज गमवावे लागले. त्यानंतर हार्दिक पंडय़ाने शेवटच्या टप्प्यात थोडीफार फटकेबाजी करत संघाला 180 धावांच्या उंबरठय़ावर पोहोचवले.
सावध प्रारंभानंतर सर्वप्रथम गायकवाडने आक्रमक पवित्र्यावर भर दिला. त्याने ऍनरिच नोर्त्झेच्या डावातील पाचव्या षटकात सलग 5 चौकार फटकावत आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली. त्याने डेव्हॉन प्रिटोरियसला डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे उत्तुंग षटकार खेचत आपली आक्रमकता आणखी अधोरेखित केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने 6 षटकात बिनबाद 57 धावा केल्या. यजमान संघाची या मालिकेतील पॉवर प्लेमध्ये ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
गायकवाडला समयोचित साथ देण्यावर भर देणाऱया इशानने नवव्या षटकात स्वीपचा षटकार खेचत आक्रमक पवित्रा घेतला. यादरम्यान गायकवाडने 30 चेंडूत अर्धशतक साजरे केले. मात्र, नंतर केशव महाराजने परतीचा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. किशनने महाराजला दोन चौकार व एक षटकारासाठी पिटाळून लावत 31 चेंडूत आपले अर्धशतक फलकावर लावले. प्रिटोरियसने किशनला हेन्ड्रिक्सकरवी झेलबाद केले. डेव्हिड मिलर व डय़ुसेन यांनी प्रत्येकी एक सोपा झेल सोडल्याने भारतीय फलंदाज सुदैवी ठरले. हार्दिक पंडय़ाने 31 तर पंतने 6 धावा केल्या. दिनेश कार्तिकला रबाडाने 6 धावांवर बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 5 बाद 179 (ऋतुराज गायकवाड 35 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 57, इशान किशन 35 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 54, हार्दिक पंडय़ा 21 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 31, श्रेयस अय्यर 11 चेंडूत 14. अवांतर 6. डेव्हॉन प्रिटोरियस 4 षटकात 2-29, रबाडा 1-31, शमसी 1-36, केशव महाराज 1-24).
द. आफ्रिका ः 19.1 षटकात सर्वबाद 131 (हेन्रिच क्लासेन 29, रिझा हेन्ड्रिक्स 23. हर्षल पटेल 4-25, यजुवेंद्र चहल 3-20).









