1.27 लाख कोटीचे उत्पादन : निर्यात 21 हजार कोटीच्या पार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मागील एक दशकात संरक्षण उत्पादनात मोठी भर पडली आहे. मेक इन इंडिया पुढाकारानंतर देशाचे संरक्षण उत्पाद असाधारण वेगाने वाढले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनाने उच्चांकी 1.27 लाख कोटीचा आकडा गाठला. एकेकाळी विदेशी पुरवठादारांवर निर्भर राहणारा भारत आता स्वदेशी उत्पादनात एक उदयोन्मुख शक्ती म्हणून उभा ठाकला आहे. देशांतर्गत क्षमतांच्या माध्यमातून भारत स्वत:च्या सैन्य शक्तीला आकार देत आहे.
भारतात आता 65 टक्के संरक्षण उत्पादने देशांतर्गत स्तरावर निर्मित होत आहेत. 16 डीपीएसयू, 430 हून अधिक परवानाप्राप्त कंपन्या आणि सुमारे 16 हजार सुक्ष्म, मध्यम अन् लघू उद्योग संरक्षण उत्पादन क्षेत्राशी जोडले गेले आहेत. तर एकूण संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचे योगदान आता 21 टक्क्यांवर पोहोचले आहे. 2029 पर्यंत संरक्षण उत्पादनात 3 लाख कोटीचा आकडा गाठण्याचे लक्ष्य आहे.
देशाची संरक्षण निर्यात 21 पटीने वाढून 10 वर्षांमध्ये 88,319 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बिहारमध्ये निर्मित बुट्स आता रशियाच्या सैन्याकडून वापरण्यात येत आहेत. भारत आता 100 हून अधिक देशांना संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहे. अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया हे भारताच्या संरक्षण सामग्रीचे सर्वात मोठे खरेदीदार ठरले आहेत. 2029 पर्यंत संरक्षण निर्यात वर्षाकाठी 50 हजार कोटीपर्यंत पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
स्वदेशी संरक्षण उत्पादनात प्रगती
भारताने 2023-24 दरम्यान मूल्याच्या संदर्भात स्वदेशी संरक्षण उत्पादनात आतापर्यंतची सर्वात मोठी वृद्धी प्राप्त केली. सर्व संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (डीपीएसयू), संरक्षण सामग्रीची निर्मिती करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील अन्य कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या आकडेवारीनुसार सरंक्षण उत्पादनाचे मूल्य 2014-15 मध्ये 46,429 कोटी रुपये होते. हे प्रमाण आता 1,27,265 कोटी रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.
मेक इन इंडियाला बळ
संरक्षण सामग्रीच्या उत्पादनातील ही वृद्धी मेक इन इंडियाच्या पुढाकारामुळे शक्य झाली आहे. यात धनुष आर्टिलरी गन सिस्टीम, अॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस), मुख्य रणगाडा (एमबीटी) अर्जुन, लाइट स्पेशलिस्ट व्हीकल्स, हाय मोबिलिटी व्हीकल्स, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसची निर्मिती सामील आहे. याचबरोबर अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा, वेपन लोकेटिंग रडार, 3डी टॅक्टिकल कंट्रोल रडार आणि सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ समवेत अत्याधुनिक सैन्य प्लॅटफॉर्म्सच्या विकासाला सक्षम करण्यात आले आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका, पाणबुडी, फ्रिगेट, कोरवेट, वेगवान गस्तनौका, फास्ट अटॅक क्राफ्ट आणि ऑफशोर पेट्रोल वेसल यासारख्या उत्पादनांची निर्मिती नौदल अन् तटरक्षक दलासाठी करण्यास यश आले आहे.
संरक्षण निर्यातीत अभूतपूर्व वृद्धी
संरक्षण उत्पादनात भारताच्या जागतिक उपस्थितीचा विस्तार, आत्मनिर्भरता आणि रणनीतिक धोरणात्मक हस्तक्षेपाद्वारे मोठी भर पडली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यात केवळ 686 कोटी रुपयांची राहिली होती. तर 2023-24 मध्ये हा आकडा वाढून 21,083 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील दशकाच्या तुलनेत हे प्रमाण 30 पट वाढ दर्शविते.









