केंद्रीय मंत्री रिजिजू यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ल
पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी भारताच्या हवामान पूर्वानुमान प्रणालींचे कौतुक केले आहे. भारताची हवामान पूर्वानुमान प्रणाली जगभरातील सर्व प्रणालींपेक्षा अधिक प्रभावी आहेत. हवामान विभागाकडून हवामानाविषयी केल्या जाणाऱ्या भविष्यवाणीच्या अचूकतेत सुधारणा झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये याचे अनुमान अचूक राहिल्याचे उद्गार रिजिजू यांनी काढले आहेत.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी)ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. मागील काही वर्षांमध्ये आमची हवामान पूर्वानुमान प्रणाली आणि त्याचे परिणाम जगभरातील अन्य सर्व प्रणालींच्या तुलनेत अधिक चांगले राहिले असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले आहे.
पूर्वानुमानाच्या सुधारासोबत आपत्तीशी निगडित मृत्यूदरात घट झाली आहे. डॉपलर रडार्सची संख्या 2013 मध्ये 15 होती, आता हे प्रमाण वाढून 35 झाले आहे. याचबरोबर भारत पुढील तीन वर्षांमध्ये आणखी रडार्स सामील करणार असल्याने ही संख्या 68 होणार आहे. 2025 पर्यंत पूर्ण देश डॉपलर वेदर रडार नेटवर्कशी जोडला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. आम्ही आपत्तींना रोखू शकत नाही, परंतु हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पूर्वतयारी करत त्याची तीव्रता कमी करू शकतो. आयएमडीने 2014 पासून जबरदस्त काम केले आहे. यंदा बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाने वेळोवेळी अचूक माहिती पुरविल्याने जीवितहानी टाळता आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.









