वृत्तसंस्था/ हांगझोऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश या क्रीडा प्रकारात भारताने सर्वोत्तम कामगिरीच्या दिशेने वाटचाल केली आहेत. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या सौरभ घोषालने हाँगकाँगच्या लेयुंगचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

पुरुष एकेरीच्या बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत सौरभ घोषालने हेन्री लेयुंगचा 33 मिनिटांच्या कालावधीत 11-2, 11-2, 11-6 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे या क्रीडा प्रकारात मिश्र दुहेरीत भारताच्या दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता पुरुष एकेरीत सुवर्णपदकासाठी गुरुवारी घोषालचा सामना टॉप सिडेड मलेशियाचा निगेशी होणार आहे. या प्रकारात भारताला यावेळी तीन सुवर्णपदके मिळवण्याची संधी मिळाली आहे. मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दीपिका आणि संधू यांनी हाँगकाँगच्या ली ई आणि वाँग हिम यांचा 7-11, 11-7, 11-9 असा पराभव केला. मात्र अन्य एका दुहेरीच्या लढतीत मलेशियाच्या अझमान आणि मोहमद कमाल यांनी भारताच्या अभय सिंग व अनहात सिंग यांचा 8-11, 11-2, 11-9 असा पराभव केला.









