वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
2025 च्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच पुरुष दुहेरीतील सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुखापतीनंतर स्पर्धेतून माघार घेतली. मालविका बनसोड तसेच मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि ऋत्विका ग•s यांनाही हार पत्करावी लागली. चीनच्या फेंगने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत 2022 साली पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या सहाव्या मानांकित ली फेंगने पराभूत केले. फेंगने सेनचा 21-10, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 45 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले.
महिला दुहेरीमध्ये भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनाही उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. चीनची द्वितीय मानांकित जोडी लियु शेंग आणि तेन निंग यांनी त्रिशा आणि गायत्री यांचा 21-14, 21-10 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या विद्यमान विजेत्या जोनाटेन ख्रिस्टीला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत तर मालविका बनसोडला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंचे एकूण आव्हान संपुष्टात आले आहे.









