वृत्तसंस्था / अमान (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील मुले आणि मुलींच्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांनी 43 पदके निश्चित केली आहेत. सदर स्पर्धा आशियाई मुष्टीयुद्ध फेडरेशन आणि विश्व मुष्टीयुद्ध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच भरविण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या आणि चार स्पर्धांकांनी आपल्या विविध वजन गटातून उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत 15, 18 तसेच 17 वर्षांखालील वयोगटामध्ये भारताच्या स्पर्धकांनी किमान 25 पदके निश्चित केली आहेत. उपांत्यफेरीत प्रवेश मिळविणाऱ्या स्पर्धकाचे कांस्यपदक असते.
63 किलो गटात अमान सिवाच, 80 किलो गटात देवानीश यांनी मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात अनुक्रमे फिलीपिन्स आणि जॉर्डनच्या स्पर्धकांवर विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. मुलींच्या विभागात 60 किलो गटात भारताच्या सिमरनजित कौरने जॉर्डनच्या आयाचा तर 70 किलो गटात भारताच्या हिमांशीने पॅलेस्टिनीच्या लैलाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश नोंदविला आहे. मुलांच्या 66 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कझाकस्थानच्या डॅनियलने भारताच्या अनंत देशमुखचा 5-0 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. तसेच 75 किलो गटामध्ये उझ्बेकच्या जुरेव्हने भारताच्या प्रियांश सेहरावतचा 5-0, 80 किलो गटात भारताच्या देवानीशने जॉर्डनच्या अलदाबासचा पराभव केला.









