वृत्तसंस्था/ गयाना
भारताची वेस्ट इंडिजविऊद्धची तिसरी ‘टी-20’ लढत आज मंगळवारी येथे होणार असून यावेळी मालिका गमावण्याचा धोका टाळण्यासाठी भारताने निर्भयपणे फलंदाजी करण्याची गरज आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने कबूल केल्याप्रमाणे विंडीजमधील संथ खेळपट्ट्यांमुळे भारतीय फलंदाजीसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
भारताने रविवारी अतिरिक्त 10-20 धावा करण्याची संधी गमावली आणि ही जाणीव त्यांना आगामी सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करून जायला हवी. भारताला द्विपक्षीय टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजकडून शेवटचा पराभव 2016 मध्ये पत्करावा लागला होता. भारत सध्या या पाच सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे त्यांनी अधिक चांगला खेळ करणे महत्त्वाचे बनले आहे. टी-20 मध्ये पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करण्याची गरज असते. परंतु इशान किशन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश असलेल्या भारताच्या वरच फळीला त्या अपेक्षांना जागता आलेले नाही. यामुळे संजू सॅमसन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी उल्लेखनीयरीत्या जुळवून घेतलेला धडाकेबाज तिलक वर्मा यासारख्या खेळाडूंवरील दबाव वाढला आहे,

विश्वचषक स्पर्धा होणार असलेल्या या वर्षात एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष असले, तरी गिल, किशन आणि सूर्यकुमार फॉर्मात येण्यास उत्सुक असतील. 31 ऑगस्टपासून सुरू होणार असलेली आशिया चषक स्पर्धा हे त्याचे आणखी एक कारण आहे. फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे, हा हार्दिकने रविवारच्या पराभवानंतर दिलेला संदेश पुरेसा बोलका आहे. भारताचे शेपूट खरे तर लांबलचक असून संतुलित बाजू राखण्यासाठी अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर ठेवलेले आहे. या सामन्यातही यात बदल होण्याची शक्यता नाही.
फॉर्मात असलेला फिरकीपटू कुलदीप यादव अंगठ्याच्या दुखापतीमुळे रविवारच्या सामन्यात खेळू शकला नव्हता आणि आगामी सामन्यात तो उपलब्ध होईल की नाही याविषयी अनिश्चितता आहे. गोलंदाजांसमोर, विशेषत: फिरकीपटूंसमोर निकोलस पूरनला रोखण्याचे आव्हान आहे. त्याने यजुवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्याविऊद्ध प्रभावीरीत्या फलंदाजी केलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डावखुरा फिरकीपटू अक्षरचा मागील सामन्यातही उपयोग करण्यात आला नाही. हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी त्या सामन्यात नवीन चेंडू प्रभावीपणे स्विंग करण्याची क्षमता दाखवली होती आणि त्याची पुनरावृत्ती करण्यास ते उत्सुक असतील.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या चहलने मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. बिश्नोईचे गुगली मात्र प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणू शकलेले नाहीत. भारतातर्फे वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सर्वाधिक महागडा ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आवेश खान किंवा उमरान मलिकला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणेच वेस्ट इंडिजच्या वरच्या फळीलाही धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला असून यामुळे निकोलस पूरनवरील जबाबदारी वाढली आहे. आज पूरन आणि शिमरॉन हेटमायर हे पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंचा आक्रमकपणे सामना करण्याचे लक्ष्य बाळगून असतील.
संघ-भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.
सामन्याची वेळ : रात्री 8 पासून, थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स.









