वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाची आणि स्वत:ची प्रगती करण्यासाठी भारतातील तरुणांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागणार आहेत, असे प्रतिपादन नीती आयोगाचे अभिताभ कांत यांनी केले आहे. भारतीयांनी किती काम करावे, या संबंधी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मान्यवरांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. या मान्यवरांमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती, लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन. सुब्रम्हणीयम आदींचा समावेश आहे. भारतीय तरुणांना आठवड्याला 70 ते 90 तास काम केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली होती. आता या प्रश्नात कांत यांनीही त्यांचे मत व्यक्त केले.
माझा कष्टांवर विश्वास आहे. भारतीयांनीही त्यांच्या शक्य तितका वेळ कामात व्यतीत करावयास हवा. काम केल्यानेच देशाची प्रगती होते आणि व्यक्तीचेही मूल्यवर्धन होते. भारताची अर्थव्यवस्था सध्या 4 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे. ती 30 लाख कोटी डॉलर्सपर्यंत न्यायची असेल, तर तरुणांनाच पुढाकार घ्यावा लागेल. कष्ट आणि सातत्याने काम केल्यासच हे ध्येय गाठता येईल. आगामी 20 वर्षांमध्ये भारताने मोठी भरारी न घेतल्यास तो जगाच्या पुष्कळ मागे पडेल आणि इतर देशांवरील त्याचे अवलंबित्व वाढेल, असे प्रतिपादन कांत यांनी केले आहे.









