वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोविड महामारीनंतर पर्यटन उद्योगाला पुन्हा गती मिळू लागली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीयांच्या विदेशात जाण्याच्या संख्येत वाढ झाली असली तरी, ऑगस्ट 2023 मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांची संख्या 19.7 टक्क्यांनी कमी राहीली असल्याचे समजते.पर्यटन मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, सुमारे 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येतील. दीर्घकाळात पर्यटनाला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचीही सरकारची योजना आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये 6 लाख विदेशी लोकांची भारताला भेट
मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांची संख्या 6 लाख होती, तर ऑगस्ट 2019 मध्ये 8 लाख लोक प्रवासासाठी आले होते. त्यानुसार, ऑगस्ट 2019 च्या तुलनेत भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांच्या संख्येत 19.7 टक्क्यांनी घट झाली आहे. आत्तापर्यंत मंत्रालयाकडे केवळ ऑगस्ट 2023 चा डेटा उपलब्ध आहे. ऑगस्ट 2019 मध्ये, कोविड साथीचा रोग पसरला नव्हता आणि लोक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत होते. मात्र आता पर्यटन उद्योगाला पुन्हा वेग आला आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये अधिक भारतीय पर्यटकांनी विदेशात प्रवास केला. जर आपण ऑगस्ट 2019 आणि ऑगस्ट 2023 ची तुलना केली तर ऑगस्टमध्ये 25 लाख भारतीय लोकांनी प्रवास केला आहे. सीएमआयइच्या डेटाने कोविडपूर्वीची परिस्थिती सांगितली होती. कोविड महामारीच्या काही काळापूर्वी, म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये 10 लाख 20 हजार विदेशी पर्यटक भारतात आले. ऑगस्ट 2023 मध्ये ही संख्या केवळ 6 लाख 40 हजारांवर पोहोचली आहे.
सर्वाधिक पर्यटक बांगलादेशातून
बांगलादेश हा भारतातील विदेशी पर्यटकांचा सर्वात मोठा स्रोत आहे. हे एकूण विदेशी आगमनाच्या 23.7 टक्के होते. यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांचा नंबर लागतो.
आखाती देशांमध्ये भ्रमंती
विदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी आखाती देश प्रमुख ठिकाण होते. एक तृतीयांश पेक्षा जास्त भारतीयांनी युएई (25.2 टक्के) आणि सौदी अरेबिया (11 टक्के) प्रवास केला, तर 50 टक्क्यांहून अधिक भारतीयांनी पहिल्या पाच देशांमध्ये प्रवास केला. हे टॉप 5 देश म्हणजे युएई सौदी अरेबिया, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूर. याचाच अर्थ विदेशात जाणाऱ्या निम्म्याहून अधिक भारतीय लोक या पाच देशांना भेट देण्यास प्राधान्य देतात. पर्यटनातून परकीय चलनाची कमाई देखील 2019 च्या तुलनेत कमी झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ते 2.3 अब्ज डॉलर होते.









