7.25 लाख भारतीय व्हिसाशिवाय अमेरिकेत दाखल
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
प्यू रिसर्च सेंटरनुसार सुमारे 7 लाख 25 हजार भारतीय हे अमेरिकेत व्हिसाशिवाय वास्तव्य करत आहेत. मेक्सिको आणि अल साल्वाडोर यांच्यानंतर भारतातील नागरिक मोठ्या संख्येत अमेरिकेत अवैध वास्तव्य करत आहेत. 2021 पर्यंत देशातील 10.5 दशलक्ष अनधिकृत स्थलांतरितांमध्ये सुमारे 3 टक्के लोक भारतीय असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्यांमध्ये मेक्सिकोच्या नागरिकांची संख्या सुमारे 41 लाख इतकी आहे. त्यानंतर अल साल्वाडोरच्या नागरिकांची संख्या 8 लाख, तर भारतीयांची संख्या 7 लाख 25 हजार आणि ग्वाटेमालाच्या 7 लाख नागरिकांचा क्रमांक लागतो.
2017-21 दरम्यान मेक्सिकोतून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत 9 लाखांची घट झाली आहे. तर त्याच कालावधीत अन्य देशांमधून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांची संख्या वेगाने वाढली आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 64 लाख इतके होते. हे प्रमाण 2017 मधील 9 लाखापेक्षा खूपच अधिक आहे. अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाच्या नव्या आकडेवारीनुसार अभूतपूर्व संख्येत दस्तऐवजांशिवाय भारतीय स्थलांतरित पायीच अमेरिकेची सीमा ओलांडत आहेत.
ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 96,917 भारतीयांना व्हिसाशिवाय अमेरिकेत प्रवेश केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना संकटानंतर सीमा खुल्या झाल्यापासून अमेरिकेत अवैध प्रवेश करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. 2021 आर्थिक वर्षात 30,662 आणि 2022 या आर्थिक वर्षात 63,927 भारतीयांना अमेरिकेच्या पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा आणि वॉशिंग्टनमध्ये अवैध स्थलांतरितांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. तर कॅलिफोर्निया आणि नेवादामध्ये अवैध स्थलांतरितांच्या संख्येत घट झाली आहे.









