भारत सरकारकडून अलर्ट जारी : संघर्ष भडकण्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीच्या उपाययोजना सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीरियातील वाढता संघर्ष आणि बंडखोर सैन्याकडून होणारे हल्ले वाढल्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या भारतीयांनी त्वरित देश सोडावा, अशा आशयाचा अलर्टही शनिवारी जारी केला. ‘आपल्या वापसीसाठी व्यावसायिक उ•ाणे लवकरात लवकर उपलब्ध होतील आणि तुमच्या सुरक्षिततेबद्दल जागरुक रहा,’ अशी सूचना करण्यात आली आहे.
सीरियातील बंडखोर सैन्याने गेल्या महिन्यात 27 नोव्हेंबरपासून राष्ट्राध्यक्ष बशर यांच्या सरकारविरोधात आघाडी उघडली होती. या संघर्षात आतापर्यंत 3.70 लाख लोक विस्थापित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी रात्री निवेदन जारी करत भारतीयांसाठी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार सीरियातील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत सीरियाला जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सीरियामध्ये आधीपासूनच उपस्थित असलेल्या भारतीयांना देश सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.
दूतावासाशी संपर्क साधण्याची सूचना
परराष्ट्र मंत्रालयाने सीरियामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना दमास्कस येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडीची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही सीरियाच्या उत्तरेकडील संघर्षाच्या अलीकडेच भडकलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सीरियामध्ये सध्या कार्यरत असलेले भारतीय नागरिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांमध्ये काम करत आहेत. आमची टीम मिशनमध्ये आहे. त्याच्याशी संपर्क साधा आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे जयस्वाल म्हणाले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









