नव्या अध्ययनातून समोर आले कारण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीयांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. धमन्यांचा (आर्टरीज) डायमीटर कमी असल्याने लोक कोरोनरी आर्टरी डिसिज (एकप्रकारचा हृदयरोग)चे शिकार ठरतात असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु, एका नव्या अध्ययनाने हा दावा फेटाळला आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या कार्डियोलॉजी आणि रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये यासंबंधी अध्ययन झाले आहे.
कोरोनरी आर्टरी डिसिजमध्ये हृदयामधील धमन्या डॅमेज होत असतात. याचे सामान्य कारण धमन्यांमध्ये फॅट जमणे असते आणि यातून रक्तप्रवाह कमी होत जातो. यामुळे छातीत वेदना होण्यापासून हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता निर्माण होते.
जर्नल ऑफ इंडियन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित या अध्ययनात 250 लोकांना सामील करण्यात आले होते. अध्ययनात सामील 51 टक्के लोकांना उच्च रक्तदाब आणि 18 टक्के लोकांना मधुमेहाचा आजार होता. तर 4 टक्के लोकांना धूम्रपानाचे व्यसन होते. 28 टक्के लोकांना कोलेस्ट्रॉल आणि फॅटची समस्या होती. 26 टक्के लोकांच्या कुटुंबामध्ये हृदयविकाराचा पूर्वेतिहास होता अशी माहिती रुग्णालयाच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जे.पी.एस. साहनी यांनी दिली आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या रक्तवाहिन्यांचा सरासरी डायमीटर खूपच कमी असतो. परंतु बॉडी सरफेस एरिया (बीएसए) समोर दोघांच्या धमन्यांचा डायमीटर महत्त्वपूर्ण ठरत नसल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. आशियाई लोक विशेषकरून भारतीयांना धमन्यांचा डायमीटर कमी असल्याने त्यात फॅट जमा होण्याचा धोका अधिक असल्याचे जगभरातील तज्ञांचे मानणे आहे. परंतु नव्या अध्ययनात भारतीयांना शरीराचा सरफेस एरिया कमी असल्याने कोरोनरी आर्टरी डिसिजची जोखीम अधिक असल्याचे दिसून आले आहे.









