वृत्तसंस्था/ बेनोनी (द. आफ्रिका)
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने संयुक्त अरब अमिरातचा 122 धावांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.
या स्पर्धेमध्ये भारताचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. आता या गटामध्ये भारताने आपले दोन्ही सामने जिंकून आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. सोमवारच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघाने 20 षटकात 3 बाद 219 धावा जमवित संयुक्त अरब अमिरातला विजयासाठी 220 धावांचे कठीण आव्हान दिले. पण त्यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर संयुक्त अरब अमिरातने 20 षटकात 5 बाद 97 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना मोठय़ा फरकाने गमवावा लागला.
भारताच्या डावामध्ये कर्णधार शेफाली वर्माने तुफानी खेळी करताना 34 चेंडूत 78 धावा झोडपल्या. तर श्वेता सेहरावतने 49 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. भारतीय संघातील रिचा घोषने 29 चेंडूत 49 धावा झोडपल्या. कर्णधार शेफाली वर्माने आतापर्यंत भारताच्या वरि÷ संघातून 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यामध्ये 51 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. सोमवारच्या सामन्यात शेफाली आणि श्वेता सेहरावत यांनी सलामीच्या गडय़ासाठी 111 धावांची शतकी भागीदारी केली. सेहरावतने डावातील पहिल्याच षटकात 3 चौकारांसह 12 धावा झोडपल्या. त्यानंतर शेफालीने डावातील दुसऱया षटकात 3 चौकार नोंदविले. शेफालीने आपले अर्धशतक चौकारानेच झळकविले. शेफालीच्या खेळीमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. शेफालीने एका षटकात 3 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा घेतल्या. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात शेफाली लाँगऑफवर झेलबाद झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नाबाद 92 धावांची खेळी करणाऱया सेहरावतने 49 चेंडूत नाबाद 74 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना संयुक्त अरब अमिरातच्या डावात सलामीची फलंदाज टी. सतीशने पहिल्या षटकात 4 चौकार मारले. पण दुसऱया षटकात भारताच्या शबनमने तिला बाद केले. संयुक्त अरब अमिरात संघातील लावण्या केणीने 54 चेंडूत 24 धावा जमविल्या. पण त्यांना 20 षटकात केवळ 97 धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 3 बाद 219 (शेफाली वर्मा 78, श्वेता सेहरावत नाबाद 74, रिचा घोष 49), संयुक्त अरब अमिरात 20 षटकात 5 बाद 97 (टी. सतीश 12, लावण्या केणी 24).









