19 वर्षांखालील महिलांची टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धा
वृत्तसंस्था/कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ‘सामनावीर’ आणि सलामीची फलंदाज जी. त्रिशाच्या 49 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय युवा महिला संघाने यजमान लंकेचा 60 धावांनी पराभव करत सुपर सहा फेरीमध्ये स्थान निश्चित केले. अ गटामध्ये भारत महिला युवा संघ आघाडीवर राहिला आहे. गुरुवारच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 9 बाद 118 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 20 षटकात 9 बाद 58 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 60 धावांनी गमवावा लागला. या विजयानंतर भारतीय युवा महिला संघाने अ गटात आघाडीचे स्थान राखत सुपर सिक्स फेरी गाठली.
भारताच्या डावामध्ये सलामीच्या गोंगाडी त्रिशाने 44 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 49, मिथिला विनोदने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, कर्णधार निकी प्रसादने 14 चेंडूत 2 चौकारांसह 11, जोशीताने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे प्रमुदी मेथसेरा, एल. तिलकरत्ना, ए. थिलगुणे यांनी प्रत्येकी 2 तर एस. रश्मिका, प्रबोधा आणि एन. मेनुडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर लंकेने 20 षटकात 9 बाद 58 धावांपर्यंत मजल मारली. लंकन संघातील एकमेव फलंदाज तिलकरत्नाने 12 चेंडूत 2 चौकारांसह 15 तर कविंदीने 1 चौकारांसह 5, थेलागुणेने 9, प्रमुदीने 1 चौकारांसह 7 धावा केल्या. लंकेच्या डावात 4 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे शबनम शकील, जोशीता आणि सिसोदीया यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आयुषी शुक्ला आणि व्ही. शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेत भारतीय संघातील आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी मलेशियाच्या विरुद्धच्या सामन्यातही दर्जेदार कामगिरी केली होती. वैष्णवी शर्माने 5 धावांत 5 गाडी बाद केले होते. भारतीय युवा महिला संघाने आपल्या अ गटातील सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकत आघाडीचे स्थान मिळविले आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 9 बाद 188 (गोंगाडी त्रिशा 49, निकी प्रसाद 11, मिथीला विनोद 16, जोशीता 14, अवातंर 7, एम. प्रमुदी तिलकरत्ना आणि थिलगुणे प्रत्येकी 2 बळी, एस. रश्मिका, प्रबोदा आणि एन. मेनुदी प्रत्येकी 1 बळी), लंका 20 षटकात 9 बाद 58 (एस. रश्मिका 15, कविंदी 5, थिलगुणे 9, अवांतर 5, शबनम शकील, जोशिता, सिसोदीया प्रत्येकी 2 बळी, शुक्ला आणि शर्मा प्रत्येकी 1 बळी).









