वृत्तसंस्था/ वुरसेस्टर
भारताच्या 19 वर्षाखालील वयोगटातील युवा क्रिकेट संघाने पाच सामन्यांची वनडे मालिका जिंकली. या मालिकेत भारताने इंग्लंड युवा संघाचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. मात्र या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 7 गड्यांनी पराभव केला.
या मालिकेमध्ये भारताचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीची कामगिरी लाजवाब झाली. त्याच्या तुफानी फटकेबाजीचे कौतुक संपूर्ण क्रिकेट क्षेत्राने केले. या मालिकेत वैभव सूर्यवंशीने जलद शतक नोंदविण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंड युवा संघाने भारताला नमविले.
शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 210 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 31.1 षटकात 3 बाद 211 धावा जमवित हा सामना 113 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी जिंकला. या सामन्यात सूर्यवंशी मात्र केवळ 33 धावावर बाद झाला. भारताच्या डावामध्ये अंबरिशने 81 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्या. सूर्यवंशीने 42 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 33, पांगलियाने 3 चौकारांसह 24, चौहानने 2 चौकारांसह 24 तर राहुल कुमारने 1 चौकारासह 21 धावा केल्या. इंग्लंडतर्फे फ्रेंच आणि अल्बर्ट यांनी प्रत्येकी 2 तर मॉर्गन, ग्रीन, फिरबँक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
त्यानंतर इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या डॉकिन्स आणि मेस यांनी अर्धशतके झळकविताना दुसऱ्या गड्यासाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. डॉकिन्सने 53 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 66 तर मेसने 76 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 82 धावा झळकविल्या. मुर्स केवळ 5 धावावर तसेच फ्लिंटॉप 4 धावावर बाद झाले. मेस आणि कर्णधार रिव्ह यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 100 धावांची भागीदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रिव्हने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 49 धावा जमविल्या. भारतातर्फे नमन पुष्पकने 2 तर देवेंद्रनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 9 बाद 210 (अंबरिश नाबाद 66, सूर्यवंशी 33, पांगलिया 24, चौहान 24, राहुल कुमार 21, फ्रेंच आणि अल्बर्ट प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड : 31.1 षटकात 3 बाद 211 (मेस नाबाद 82, डॉकिन्स 66, रिव्ह नाबाद 49, पुष्पक 2-65, देवेंद्रन 1-34).









