वृत्तसंस्था / उलानबातर (मंगोलिया )
ऑलिम्पिक डॉट कॉमच्या वृत्तानुसार शुक्रवारी मंगोलिया येथे झालेल्या उलानबातर ओपन 2025 कुस्ती रँकिंग सिरीज स्पर्धेत भारतीय कुस्तीगीरांनी आपला प्रभावी फॉर्म दाखवत चार सुवर्णासह सहा पदके जिंकली. महिलांच्या 53 किलो वजन गटात प्रभावी कामगिरी करणाऱ्या पॅरिस 2024 ऑलिम्पियन अंतिम पांघल या स्पर्धेत आघाडीवर होत्या. तिने मंगोलियाच्या एरियुनजाया ओडोनचिमेगवर 10-0 असा जिय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि तटस्थ खेळाडू नतालिया मालिशेवावर 10-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले.
वरिष्ठ स्तरावर पदार्पण करणाऱ्या नेहा सांगवानने 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मंगोलियाच्या ऑलिम्पियन बोलोर्तुया खुरेलखुऊचा 4-0 असा पराभव करुन अव्वल स्थान पटकाविले. मुस्कान (59 किलो) आणि हर्षिता 72 (किलो) यांनीही आपल्या वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. नॉर्डिक पद्धतीने स्पर्धा करताना दोन्ही मल्ल प्रत्येक चार विजयांसह अपराजित राहिले. मुस्कानच्या सुवर्णपदकाच्या वाटचालीत मंगोलियाच्या अनुदारी बतखुयागवर 13-5 असा विजय आणि तुर्कीच्या बेदिहा गनवर 5-4 असा विजय होता. माजी यू-17 विश्वविजेत्या हर्षिताने मंगोलियाच्या आशियाई चॅम्पियन बोलोर्तुंगलाग झोरिग्टनवर महत्त्वाचा विजय मिळवत पदकाच्या वरच्या स्थानावर पोहोचली. पुरुषांच्या ग्रीको-रोमन 60 किलो गटात सुरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर नीलमने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल विभागात कांस्यपदक जिंकले.
शुक्रवारच्या निकालांसह उलानबातर ओपनमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. ज्यामध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदके आहेत. उलानबातर ओपन ही युडब्ल्युडब्ल्यु रँकिंग सिरीज कॅलेंडरवरील तिसरी स्पर्धा आहे आणि त्यात 200 हून अधिक मल्लांचा सहभाग आहे. शनिवारीही ही स्पर्धा सुरू राहिल. ज्यामध्ये महिलांच्या फ्रीस्टाईल वजनी गटात आणखी पाच आणि पुरुषांच्या फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदकांच्या लढतींचा पहिला सेट असेल.









