पहिल्या वनडेत इंग्लंडवर 4 विकेट्सनी मात : सामनावीर दीप्ती शर्माची नाबाद अर्धशतकी खेळी : मालिकेत 1-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/साऊदम्प्टन
भारतीय महिला संघाने साउथहॅम्प्टन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. दीप्ती शर्माचे शानदार अर्धशतक आणि स्नेह राणाची उत्कृष्ट गोलंदाजी या जोरावर टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश महिला संघाने 50 षटकांत 6 बाद 258 धावा केल्या. भारताने हे आव्हान 10 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने 48.2 ओव्हरमध्ये 262 धावा केल्या. प्रारंभी, इंग्लंडने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार हरमनप्रीतचा हा निर्णय सार्थ ठरवताना पहिल्या पाच षटकांतच इंग्लंडला दोन धक्के बसले.
सलामीवीर ब्युमाँट (5) आणि अॅमी जोन्स (1) धावा करुन बाद झाल्या. यानंतर एम्मा लँब व नॅट सिव्हर ब्रंट यांनी संघाचा डाव सावरला. लँबने 39 तर स्केव्हियरने 41 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर सोफिया डंकले आणि डेव्हिडसन रिचर्ड्सने शतकी भागीदारी करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. डंकलेने सर्वाधिक 9 चौकारासह 83 धावा केल्या तर रिचर्ड्सने 53 धावांची खेळी साकारली. याशिवाय, सोफी एक्लेस्टोनने नाबाद 23 धावा फटकावल्या. या जोरावर इंग्लंडने 6 बाद 258 धावापर्यंत मजल मारली. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अमनजोत कौर आणि श्री चरणी या दोघींच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दीप्तीचे नाबाद अर्धशतक
259 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी प्रतीका रावल आणि स्मृती मानधना (28 धावा, 24 चेंडू, पाच चौकार) यांनी चांगली सुरुवात केली. दोघींत 48 धावांची भागीदारी झाली. स्मृतीला लॉरेन बेलने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर प्रतीकाने (36 धावा, 51 चेंडू, तीन चौकार) हरलीन देओल (27 धावा, 44 चेंडू, चार चौकार) सोबत 46 धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच प्रतिका बाद झाली. पाठोपाठ हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौरही लागोपाठ बाद झाल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्यात महत्वपूर्ण अशी 87 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयासमीप नेले. जेमिमाने 5 चौकारासह 48 धावांचे योगदान दिले तर दीप्तीने शानदार खेळी साकारताना 64 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 62 धावा फटकावल्या. जेमिमा बाद झाल्यानंतर रिचा घोष (10), अमनजोत कौर (नाबाद 20) यांनी दीप्तीला साथ देत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इंग्लंडकडून चार्ली डीनने 2 तर लॉरेन बेल, एक्लेस्टोन, फिलेर यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड महिला संघ 50 षटकांत 6 बाद 258 (एम्मा लँब 39, नॅट सिव्हर ब्रंट 41, सोफीया डंकले नाबाद 83, रिचर्ड्स 53, क्रांती गौड आणि स्नेह राणा प्रत्येकी दोन बळी) भारतीय महिला संघ 48.2 षटकांत 6 बाद 262 (प्रतिका रावल 36, स्मृती मानधना 28, जेमिमा रॉड्रिग्ज 48, दीप्ती शर्मा नाबाद 62, चार्ली डीन 2 बळी).









