इंग्लिश महिला संघावर 5 गडी राखून विजय : स्मृती मानधनाची 48 धावांची शानदार खेळी :
वृत्तसंस्था/ मुंबई
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लिश महिला संघावर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 126 धावांवर आटोपला. यानंतर भारतीय संघाने विजयी आव्हान 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. तिसऱ्या सामन्यात जरी भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी इंग्लिश महिला संघाने ही टी 20 मालिका 2-1 फरकाने जिंकली.
प्रारंभी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरने सोफिया डंकले आणि मायिया बाउचरला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताच्या विकेट्सचे खाते उघडले. डंकले 11 धावा करू शकली. याचवेळी बाउचरला खातेही उघडता आले नाही. सायका इशाकने अॅलिस कॅप्सीला बाद केले. तिला 7 धावा करता आल्या. यानंतर एमी जोन्स आणि कर्णधार हीदर नाईट यांनी चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना एमी जोन्सला सायकाने बाद केले. सायकाने 12 व्या षटकात जोन्सला बाद करून ही भागीदारी मोडली. तिला 21 चेंडूत 25 धावा करता आल्या. यानंतर सायकाने पुढच्याच चेंडूवर डॅनियल गिब्सनला (0) क्लीन बोल्ड केले. पुढच्या षटकात श्रेयंकाने बेस हिथला झेलबाद केले. तिला 1 धाव करता आली. पुढच्याच चेंडूवर श्रेयंकाने फ्रेया केम्पला (0) पायचीत आऊट केले. श्रेयंकाने 15 व्या षटकात एक्लेस्टोनला बोल्ड केले. तिला दोन धावा करता आल्या. यानंतर 76 धावांवर 8 विकेट पडल्यानंतर हीदरने चार्ली डीनसोबत नवव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. हीदरने 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांचे योगदान दिले. यामुळे इंग्लिश महिला संघाला शतक पार करता आले. चार्ली डीनने 15 चेंडूत नाबाद 16 धावा करत तिला चांगली साथ दिली. हीदर शेवटच्या षटकात बाद झाली. तर महिकाला गौरला खातेही उघडता आले नाही. यामुळे इंग्लंडचा डाव 20 षटकांत 126 धावांवर आटोपला. भारताकडून सायका आणि श्रेयंकाने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर रेणुका ठाकूर आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.
टीम इंडियाचा शानदार विजय
इंग्लंडने विजयासाठी दिलेले 127 धावांचे आव्हान टीम इंडियाने 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर स्मृती मानधनाने 48 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 48 धावांची सर्वाधिक खेळी करत विजयात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय, जेमिमा रॉड्रिग्जने 4 चौकारासह 29 तर दीप्ती शर्माने 2 चौकारासह 12 धावा केल्या. अखेरच्या चार षटकांत विकेट गेल्याने भारतीय संघासमोर चिंतेचे ढग होते पण हरमनप्रीत कौरने नाबाद 6 तर अमनजोत कौरने 2 चौकारासह नाबाद 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून केम्प व सोफी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड महिला संघ 20 षटकांत सर्वबाद 126 (हीदर नाईट 52, एमी जोन्स 25, चार्ली डीन नाबाद 16, सायका 22 धावांत 3 तर श्रेयंका 19 धावांत 3 बळी).
भारतीय महिला संघ 19 षटकांत 5 बाद 130 (स्मृती मानधना 48, जेमिमा रॉड्रिग्ज 29, दीप्ती शर्मा 12, हरमनप्रीत नाबाद 6, अमनजोत कौर नाबाद 10, फ्रेया केम्प व सोफी प्रत्येकी दोन बळी).









