वृत्तसंस्था/ ग्वांगझू
भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत बलाढ्या दक्षिण कोरियाचा 4-2 ने धुव्वा उडवला. वैष्णवी फाळके, संगीता कुमारी, लालरेसियामी आणि ऋतुजाने प्रत्येकी एक गोल करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता, भारताची पुढील लढत दि. 11 रोजी चीनविरुद्ध होईल.
चीनमधील ग्वांगझू शहरात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी साखळी फेरीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. तीनही लढती जिंकत भारतीय संघ अव्वलस्थानी राहिला. यानंतर बुधवारपासून सुरु झालेल्या सुपर-फोरमधील पहिल्याच लढतीत टीम इंडियाने कोरियाला 4-2 असा पराभवाचा दणका दिला. कोरियाविरुद्ध सुरुवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळताना संपूर्ण सामन्यावर वर्चस्व ठेवले. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला वैष्णवी फाळकेने गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पहिल्या व दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला गोल करता आला नाही. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे ही आघाडी कायम होती.
मध्यंतरानंतर मात्र भारतीय संघाने तीन गोल केले. यातील पहिला गोल 33 व्या मिनिटाला संगीता कुमारीने करत भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. यानंतर मात्र लगेचच कोरियाच्या युजीन किमने गोल करत आघाडी 2-1 अशी कमी केली. कोरियाच्या गोलनंतर भारतीय संघ पुन्हा आक्रमक मोडवर आल्याचे पहायला मिळाले. 40 व्या मिनिटाला लालरेसियामीने शानदार गोल करत टीम इंडियाला पुन्हा 3-1 असे पुढे नेले. यानंतर शेवटच्या सत्रात 53 व्या मिनिटाला कोरियन युजिन किमने आपला दुसरा गोल केला व आघाडी 3-2 अशी कमी केली. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना ऋतुजाने भारतासाठी चौथा गोल केला आणि हाच गोल भारतीय संघाच्या विजयासाठी पुरेसा ठरला. कोरियन संघाला हा सामना 4-2 अशा फरकाने गमवावा लागला. दुसरीकडे, भारतीय संघाने सुपर-फोर लढतीत शानदार विजय मिळवत तीन गुणांची वसुली केली.
चीनचा जपानवर 2-0 ने विजय
महिलांच्या आशिया चषकातील अन्य एका लढतीत यजमान चीनने जपानला 2-0 असे नमवत सुपर-फोरमधील पहिला विजय मिळवला. बुधवारी सायंकाळी झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासून चीनने आपले वर्चस्व गाजवले. याउलट जपानला एकही गोल नोंदवता आला नाही. चीनने या विजयासह तीन गुणाची कमाई केली. आता, त्यांची पुढील लढत आज भारतीय संघाशी होईल.









