वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात येथे रविवारी दुसरा वनडे सामना खेळविला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या गचाळ फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी मिळाली. आता रविवारच्या सामन्यात भारतीय संघाला सुधारीत फलंदाजीवर अधिक भर द्यावा लागेल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5.30 वाजता सुरु होईल.
या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ हा जागतिक महिला क्रिकेट क्षेत्रातील बलाढ्या आणि अव्वल म्हणून ओळखला जातो. भारतीय महिला संघाला अद्याप ऑस्ट्रेलियात मालिका जिंकता आलेली नाही. सध्या भारतीय महिला संघातील काही खेळाडू बिग बॅश लीग स्पर्धेत खेळत असतात. तर काही खेळाडू स्थानिक राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत खेळत आहेत. शनिवारी येथे झालेल्या पावसामुळे भारतीय संघाला विशेष सराव करता आला नाही. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मेगान शूटच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज साफ कोलमडले. नव्या चेंडूवर शुटची गोलंदाजी अप्रतिम झाली होती. भारतीय महिला संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी फारशी करता आली नाही. फलंदाजीत सातत्य दिसत नव्हते. भारतीय संघातील रेणूका ठाकुर आणि प्रिया मिश्रा यांना गोलंदाजीचा सूर मिळणे जरुरीचे आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मेगान शूटने 19 धावांत 5 गडी बाद केले होते. तर नवोदित गोलंदाज जॉर्जीया व्हॉल हिने पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीची चुनूक दाखविली.
मॅकग्राच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघ रविवारच्या सामन्यात सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत तसेच सांघिक खेळावर अधिक भर देत मालिका विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार हरमनप्रित कौर, उपकर्णधार स्मृती मानधना तसेच जेमीमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष यांना फलंदाजीचा सूर मिळणे जरुरीचे आहे. भारतीय संघ रविवारच्या सामन्यात निराशा करणार नाही, अशी ग्वाही कर्णधार हरमनप्रित कौरने दिली आहे.









