वृत्तसंस्था / बडोदा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मंगळवारी येथे यजमान भारत आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या सामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विंडीजला 211 धावांनी पराभव केला असल्याने आता कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष्य मालिका विजयावर राहिल.
भारताच्या दौऱ्यावर आलेल्या विंडीज महिला क्रिकेट संघाला या मालिकेपूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत एकतर्फी पराभव करावा लागला होता. भारतीय संघातील सलामीची फलंदाज स्मृती मानधनाला फलंदाजीचा सूर मिळाल्याने भारताला मंगळवारच्या सामन्यात विजयाची अधिक आशा निर्माण झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने 102 चेंडूत 91 धावा जमविल्या होत्या. पहिल्या सामन्यात भारताच्या रेणूकासिंग ठाकुरची गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली होती. विंडीज संघाच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार मॅथ्युज, कॅम्पबेल, डॉटीन यांच्यावर आहे. रेणूकासिंग ठाकुरला पहिल्या सामन्यातील कामगिरीने अधिक आत्मविश्वास निर्माण झाल्याने ती आता मंगळवारच्या सामन्यातही भेदक गोलंदाजी करण्यास सज्ज झाली आहे. मानधना, रॉड्रिग्ज, देवल,रिचा घोष आणि रावल तसेच दिप्ती शर्मा या भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. विंडीज संघाला मंगळवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. मात्र कर्णधार हरमनप्रित कौरसमोर अद्याप तंदुरुस्तीची समस्या पूर्णपणे संपलेली नसल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. मानधनाने अलिकडच्या कालावधीत सलग तीन सामन्यात अर्धशतके झळकविली आहेत.









