वृत्तसंस्था/ मीरपूर
यजमान बांगलादेश आणि भारत महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने रविवारी बांगलादेशचा 7 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली होती. आता येथे या मालिकेतील मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात शेफाली वर्मा फलंदाजीत अधिक दमदार कामगिरी करत आपल्या संघाला मालिका विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील रविवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 35 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली होती. तर स्मृती मानधनाने उपयुक्त 38 धावा झळकाविल्या होत्या. अनुशा बारेडी आणि मिनू मणी हे नवोदीत चेहरे असून त्यांना संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज दिप्ती शर्माचे मार्गदर्शन लाभत आहे. मात्र भारताची आघाडीची फलंदाज शेफाली वर्माला फलंदाजीचा सूर मिळालेला नाही. हाताच्या बोटाला बरीच सूज असतानाही तिने पहिल्या सामन्यात फलंदाजी केली. पण तिला आपले खाते उघडता आले नाही. बांगलादेशच्या मारुफा अख्तरने शेफालीला बाद केले होते. भारतीय महिला संघातील हरियाणाची शेफाली वर्मा ही एक आक्रमक आणि अनुभवी फलंदाज म्हणून ओळखली जाते. मात्र ती अलिकडच्या कालावधीत अधिक धावा जमविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेफाली वर्माने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 57 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये शेफालीला केवळ एकदाच अर्धशतक पार करता आले होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 सामन्यात शेफाली वर्माने शतक झळकाविले होते. लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रमुख प्रशिक्षक म्हणून अमोल मुजूमदार लाभणार आहेत. भारतीय महिला संघ मंगळवारच्या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवून मालिका सिलबंद करण्यासाठी आतूरलेला आहे.
भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांच्या दर्जांची तुलना केली तर बांगलादेश संघातील फलंदाज शोरना अख्तर चेंडूमागे एक धाव अशी गती राखण्यावर भर देते. पहिल्या सामन्यात तिने 28 चेंडूत 2 षटकारांसह 28 धावा झळकाविल्याने बांगलादेशला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला होता. बांगलादेश संघातील पहिले 7 फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करताता. भारतीय संघातील दिप्ती शर्मा, अनुशा आणि मिनू यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. मंगळवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकली होती.
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमीमा रॉड्रिग्युज, यास्तिका भाटीया, हर्लिन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्रकर, मेघना सिंग, अंजली सर्वानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुशा बारेडी आणि मिनू मणी.
बांगलादेश महिला संघ : निगर सुल्ताना (कर्णधार), शमिमा सुल्ताना, मुर्शिदा खातून, शोभना मोसटेरी, शौरना अख्तर, रितू मोनी, नाहिदा अख्तर, फहिमा खातून, रबिया खान, शंजिदा अख्तर, सलमा खातून, मारुफा अख्तर, दिलारा अख्तर, दिशा विश्वास, सुल्ताना खातून, एस. राणी.
सामन्याची वेळ : दु. 1.30 वाजता.









