वृत्तसंस्था/ अलान्या (तुर्की)
‘सॅफ’ क्षेत्राबाहेरील पहिलेवहिले वरिष्ठ फुटबॉल विजेतेपद जिंकण्याच्या भारताच्या आशा मंगळवारी येथे झालेल्या राऊंड रॉबिन तुर्की महिला चषक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात कनिष्ठ मानांकित कोसोवोने ‘इंज्युरी टाकम’च्या वेळी केलेल्या गोलाने धुळीस मिळवल्या. 1-0 असा फरकाने त्यांना हा विजय एरलेटा मेमेटी (92 वे मिनिट) हिने केलेल्या गोलामुळे मिळाला.
‘फिफा’च्या क्रमवारीत 100 व्या स्थानावर असलेल्या कोसोवोला या विजयाने तीन सामन्यांतून नऊ गुणांनिशी सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले आहे. भारत क्रमवारीत त्यांच्यापेक्षा 35 स्थानांनी वर असला, तरी सहा गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानण्याची त्यांच्यावर पाळी अली. असे असले, तरी भारतीय संघाने या स्पर्धेतील तीन सामन्यांत केलेली कामगिरी ही सर्वोत्तम राहिली. भारताच्या मनीषा कल्याणला संपूर्ण स्पर्धेतील तिच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर म्हणून गौरविण्यात आले.
भारतासाठी हा जिंकू किंवा मरू अशा प्रकारचा सामना होता, तर नोव्हेंबर, 2022 मध्ये स्लोव्हेनियाविऊद्ध 1-3 असा शेवटचा पराभव स्वीकारलेल्या कोसोवोसाठी बरोबरी पुरेशी होती. भारताने हाँगकाँगविऊद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात खेळलेल्या संघात एक बदल करताना संगीता बसफोरेला कार्तिका अंगमुथूची जागा दिली. भारताने प्रसंगी कोसोवोच्या बचावफळीवर भरपूर दबाव टाकला. यातून त्यांना अनेक संधी मिळाल्या आणि विरोधी बचावफळीला त्यांनी गोंधळातही टाकले.
सौम्या गुगुलोथला पहिल्या सत्रात सर्वोत्तम संधी मिळाली होती. तेव्हा प्यारी हिने कोसोवोच्या गोलक्षेत्राच्या काठावर चेंडू ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. तिने तो सौम्याकडे दिल्यानंतर भारताच्या विंगरपुढे फक्त जेल्झा मेहमेतीला चकविण्याचे आव्हान होते. परंतु तिने फटकावलेला चेंडू सरळ कोसोवोच्या त्या गोलरक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर मनीषाने फटकावलेली फ्री-किक मेहमेतीने झेप घेत निष्फळ ठरविली. मनीषाला त्यानंतर आणखी एक संधी मिळाली होती. त्यावेळी तिने फटकावलेला चेंडू गोलरक्षकाने अडविला. परंतु परत आलेल्या चेंडूवर तिने मारलेला फटका बाहेर गेला. पहिल्या सत्रापेक्षा दुसरे सत्र अधिक चुरशीचे राहून कोसोवोने टाकलेल्या दबावाने अनेकदा भारतीय बचावफळीला थकविले.









