वृत्तसंस्था / नवी मुंबई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथील डी.वाय.पाटील स्टेडियमवर मंगळवारी यजमान भारत आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या सामन्याला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामना भारताने यापूर्वीच जिंकला असून आता हरमनप्रित कौरचा संघ मालिका विजय मिळविण्याच्या दिशेने सज्ज झाला आहे.
या मालिकेतील रविवारचा पहिला सामना भारताने 49 धावांनी जिंकला होता. भारतीय महिला संघाला अलिकडच्या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये एकतर्फी वनडे मालिका गमवावी लागली होती. भारतीय महिला संघाने टी-20 प्रकारात आतापर्यंत विंडीज विरुद्ध 9 सामने जिंकले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवले. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. आता मंगळवारच्या सामन्यात विंडीजचा संघ फलंदाजी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. डॉटीन आणि जोसेफ यांच्याकडून अधिक धावांची अपेक्षा बाळगली जाते. भारतीय संघाला मालिका विजय मिळविण्यासाठी निश्चितच क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाकडून विंडीजला अनेक जीवदाने मिळाली. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त मानधना, हरमनप्रित कौर, रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री तसेच दिप्ती शर्मावर राहिल. राधा यादव, रेणूक ठाकुर, तितास साधू आणि सईमा ठाकुर हे भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.









